आई सुदृढ असेल तर सदृढ बाळ जन्माला येते; कमी वजनाच्या बाळाला धोके काय?
By बापू सोळुंके | Published: September 5, 2024 08:01 PM2024-09-05T20:01:14+5:302024-09-05T20:01:28+5:30
गर्भधारणा होऊन ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी बाळाचा जन्मल्यास बाळाचे वजन कमी असते.
छत्रपती संभाजीनगर: आजकाल विविध कारणांमुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येतात. सुदृढ बाळ जन्माला घालायचे असेल तर आईचे आरोग्यही सुदृढ असणे आवश्यक आहे. रक्तदाब, मधूमेह, थाॅयराईड, रक्ताक्षय असे कोणतेही आजार मातेला असू नये, शिवाय तिचे वयही जास्त असल्यास बाळ कमी वजनाचे जन्मते. आईच्या जिवाला धोका होऊ नये,यासाठी बऱ्याचदा ९ महिन्यापूर्वीच सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागतो.
कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची ही आहेत प्रमुख कारण?
गर्भधारणा होऊन ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी बाळाचा जन्मल्यास बाळाचे वजन कमी असते.
गरोदरपणात सकस आहार न घेतल्यास
गर्भवती स्त्रीने संपूर्ण नऊ महिन्याच्या कालावधीत सकस आहार घेणे महत्वाचे असते. तिने सकस आहार न घेतल्यास गर्भातील बाळाचे पोषण होत नाही. परिणामी बाळ कमी वजनाचे जन्माला येते.
गर्भवतीला रक्तदाब, मधूमेहासह , हृदयासंबंधी आजार, थायरॉईड, रक्तक्षय,सिकलसेल असे आजार असल्यास त्याचे विपरित परिणाम बाळाच्या वाढीवर होते. गर्भातील बाळाचे वजन वाढत नाही. आईच्या जिवाला धोका निर्माण होतो, यामुळे शेवटी ३८ आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच डॉक्टर सिझरियन प्रसूती करण्याचा सल्ला देतात.
कमी वजनाच्या बाळाला धोके काय?
प्रतिकारक शक्ती कमी
कमी वजनाचे बाळ जन्मल्यास त्याची रोगप्रतिकार क्षकमी कमी असते. परिणामी त्यास जास्त थंडी आणि गर्मीही सहन होत नाही.
कावीळ, न्यूमोनिया होणयाचा धोका :
कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला कावीळ, न्यूमोनिया सारख्या आजाराचा धोका असतो. अशावेळी डॉक्टर नवजात अर्भकास तातडीने वार्मरमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात.
वयाच्या पाच वर्षापर्यंत बालमृत्यूची शक्यता:
कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाच्या वयाच्या पाच वर्षापर्यंत त्याचा मृत्यू होण्याचा धोका असतो.अशा बाळांना लवकर जंतूसंसर्ग होतो आणि तो आजारांना बळी पडतो.
काळजी घ्यावी
आई सुदृढ असेल तर बाळ सदृढ जन्माला येते. गर्भवती स्त्रिला रक्तदाब, मधूमेह,ह्दय विकार, गर्भारपणात सकस आहार न घेेणे, रक्ताक्षय आदी प्रमुख कारणामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येत असते. कमी वजनाच्या बाळाचा जन्म झाल्यापासून त्याच्या आयुष्याला पाच वर्षापर्यंत धोका असतो. यामुळे बाळ कमी वजनाचे येऊ नये, यासाठी काळजी घ्यावी.
- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभाग प्रमुख, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र. घाटी रुग्णालय.