भेसळीचा प्रयोगशाळेकडून अहवालच येईना सांगा, कशी राहील भेसळवाल्यांना भीती?
By साहेबराव हिवराळे | Published: July 4, 2024 06:45 PM2024-07-04T18:45:19+5:302024-07-04T18:45:36+5:30
अन्न व औषधी विभागाने दूध, तेल, तूप, आइस्क्रीम, शीतपेये, मिठाया आदी पदार्थांची तपासणी करून ३८ नमुने प्रयोगशाळेला पाठविले.
छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषधी प्रशासनाने दिवाळीत विविध ठिकाणी ३८ खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीला पाठविले. पण, त्यांचा अद्यापही अहवाल आलेला नाही.
मध्यंतरी ‘लोकमत’ने भाजी मंडईतील भाज्यांच्या स्वच्छतेविषयी सत्यता उघडकीस आणली. याबाबत विचारले असता असता अन्न व औषध प्रशासनाने ते काम आमचे नसून मनपाचे असल्याचे सांगून हात वर केले. अन्न व औषधी विभागाने दूध, तेल, तूप, आइस्क्रीम, शीतपेये, मिठाया आदी पदार्थांची तपासणी करून ३८ नमुने प्रयोगशाळेला पाठविले. परंतु, त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.
अन्न व औषधी प्रशासन विभागात निवृत्त झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेकांची जबाबदारी मोजक्याच कर्मचारी व अधिकाऱ्यांना पार पाडावी लागते. शासन जागा भरेल तेव्हा काम अधिक सक्षमपणे गतिमान होणार असल्याचे सांगण्यात येते. ठोस पावलेच उचलली जात नसेल तर अन्न व औषधी विभागाचा भेसळ करणाऱ्यांवर कसा धाक राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने धडक कारवाई करणे गरजेचे आहे, असे नागरिक प्रेम चव्हाण, विनोद कोरके यांनी सांगितले.
अहवालाची प्रतीक्षा
अन्न व औषधी झोन विभाग १ आणि २ क्षेत्रात विविध पदार्थांचे पथकाने नमुने घेतलेले असून, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. अहवाल आल्यावर सहआयुक्त अर्जुन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.