परीक्षेत नेटवर्कचा अडथळा आला, तर समन्वयकाला कळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:04 AM2021-05-01T04:04:51+5:302021-05-01T04:04:51+5:30
औरंगाबाद : पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या उद्भवली, तर त्याने तात्काळ आपल्या महाविद्यालयातील आयटी ...
औरंगाबाद : पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या उद्भवली, तर त्याने तात्काळ आपल्या महाविद्यालयातील आयटी कोऑर्डिनेटरकडे संपर्क करून ही बाब कळविल्यास त्याला पुन्हा पेपरची लिंक उपलब्ध करून दिली जाईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आलेले पदवी अभ्यासक्रमाचे पेपर ३ मेपासून, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मेपासून घेण्यात येणार आहे. आता उर्वरित पेपर व परीक्षा फक्त ऑनलाइन घेतल्या जाणार असून, ग्रामीण भागात विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या जाणवल्यास त्याने घाबरून न जाता तात्काळ ही घटना आपल्या संबंधित महाविद्यालयातील आयटी कोऑर्डिनेटरला कळवावी. त्या कोऑर्डिनेटरने विद्यापीठातील परीक्षा विभागाला त्यासंबंधी माहिती द्यावी. त्यानंतर लगेच संबंधित विद्यार्थ्याला आलेल्या समस्येविषयी खातरजमा केली जाईल. ऑनलाइन परीक्षेसंबंधीच्या पोर्टलवर कोणत्या विद्यार्थ्याला काय समस्या आली, हे ताबडतोब समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता त्यांना परीक्षा कालावधीत लगेचच लिंक उपलब्ध करून देण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठाकडे तक्रार करण्याची आवश्यकता नाही, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
चौकट......
मेअखेरपर्यंत निकालाचे नियोजन
कला व वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाचे द्वितीय, तृतीय वर्षाचे बहुतांशी पेपर संपले आहेत. विज्ञान शाखेचे ३० टक्के पेपर बाकी आहेत. याशिवाय या तीनही शाखांच्या प्रथम वर्षाचे पेपर १५- १६ मेपर्यंत चालणार आहेत. प्रथम वर्षाची परीक्षा संपल्याशिवाय उर्वरित द्वितीय व तृतीय वर्षाचे निकाल तांत्रिकदृष्ट्या जाहीर करता येत नाहीत. दुसरीकडे, यापूर्वी ऑफलाइन झालेल्या परीक्षेतील पेपर तपासणीचा संपूर्ण अहवाल महाविद्यालयांकडून परीक्षा विभागाला प्राप्त झालेला नाही. कोरोना संसर्गामुळे महाविद्यालयांना तो अहवाल २ मेपर्यंत विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे मेअखेरपर्यंत पदवी परीक्षेचे निकाल जाहीर होतील, अशी शक्यता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी वर्तविली आहे.