‘त्रिसूत्री’चे पालन केल्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:02 AM2021-02-20T04:02:01+5:302021-02-20T04:02:01+5:30
डॉक्टरांचा सल्ला : काही होत नाही, म्हणू नका, स्वतः नियम पाळा आणि दुसऱ्यांनाही पाळायला सांगा औरंगाबाद : कोरोना ...
डॉक्टरांचा सल्ला : काही होत नाही, म्हणू नका, स्वतः नियम पाळा आणि दुसऱ्यांनाही पाळायला सांगा
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस आली आणि लोकांच्या मनातील भीती दूर झाली. खबरदारीशिवाय मुक्त संचार झाला. त्यातूनच कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे; पण ‘त्रिसूत्री’चे पालन केल्यास कोरोनाला दूर ठेवणे शक्य आहे. ही त्रिसूत्री म्हणजे मास्कचा वापर, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करणे. वर्षभरापूर्वी जी खबरदारी घेतली, तीच आताही घ्या आणि कोरोनापासून दूर राहा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणा, प्रशासन अधिक सतर्क झाले आहे; पण नागरिकांनी खबरदारी घेतली तर उपचार घेण्याची आणि क्वारंटाइन होण्याची वेळच येणार नाही. त्यासाठी सर्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन केले पाहिजे. मास्क घालूनच घराबाहेर पडले पाहिजे आणि वारंवार हात स्वच्छ केले पाहिजे, असे डॉक्टरांनी सांगितले.
वर्षभरापूर्वी कोरोनाच्या सुरुवातीला प्रत्येक जण इतरांपासून चार हात दूरच राहत होता. कोणी साधे शिंकले तरी काळजी व्यक्त केली जात असे; पण गेल्या काही दिवसांपासून काही होत नाही म्हणून गळा भेट घेतली जात आहे, गर्दी केली जात आहे. यातूनच कोरोना वाढीला हातभार लागत आहे; पण काही होत नाही म्हणू नका. स्वतः नियम पाळा आणि दुसऱ्यांनाही पाळायला सांगा, असे आवाहन डॉक्टरांनी, आरोग्य यंत्रणेने केले आहे.
चौकट...
ही खबरदारी प्रत्येक जण घेऊ शकतो
सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मस्कचा वापर.
गरज असेल तरच घराबाहेर पडा.
आजार लपवू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सर्दी, खोकला असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
डॉक्टरांनी कोरोना तपासणीचा सल्ला दिल्यास तपासणी करा.
सार्वजनिक ठिकाणी कोणी मास्क वापरत नसेल तर मास्क वापराचे आवाहन करा.
चौकट..
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव आहेच. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तशी कमी आहे; परंतु परिस्थिती पाहता मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सचे नागरिकांनी पालन केले पाहिजे.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
पूर्वीच्या सूचना आजही लागू
पूर्वी ज्या सूचना होत्या, त्या सूचना आजही लागू आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर केला पाहिजे. विनाकारण कुठेही गर्दी करू नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.
-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक