...तर बिबटे, तडस शहरात येतील !

By Admin | Published: March 18, 2016 01:02 AM2016-03-18T01:02:52+5:302016-03-18T01:52:38+5:30

जालना : जेथे माणसाला हंडाभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली तेथे वन्यप्राण्यांची काय गत. पाणीटंचाईच्या झळा मार्चमध्येच तीव्र होत असून,

If you are in the city, then you will be scared! | ...तर बिबटे, तडस शहरात येतील !

...तर बिबटे, तडस शहरात येतील !

googlenewsNext


जालना : जेथे माणसाला हंडाभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली तेथे वन्यप्राण्यांची काय गत. पाणीटंचाईच्या झळा मार्चमध्येच तीव्र होत असून, याचा सर्वाधित फटका वन्य प्राण्यांना बसत आहे. भोकरदन, बदनापूर तालुक्यात हरीण, काळविट, वानर, तडस, बिबटे या प्राण्यांनी पाण्याच्या शोधार्थ आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. बदनापूर तालुक्यातील चनेगावमध्ये दोन दिवसांपूर्वी बिबट्याने दोघांवर केलेल्या हल्ल्यातून वनविभागाने धडा घेण्याची गरज आहे. तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर वन्य प्राणी शहरात दिसल्यास नवल नाही.
जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. कडक उन्हामुळे जलसाठे तसेच राना-वनात असलेले पाणवठे कोरडेठाक पडल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ शहराकडे वळत आहेत. हरीण, कोल्हे, लांडगे, मोर, नील गायी आदी विविध प्राणी गाववस्तीकडे येत असल्याने ग्रामस्थही दहशतीखाली आहेत. दोन दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याने दोन जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले होते.
जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर वन विभागाचे आठ तालुक्यांत मिळून ९ हजार हेक्टर पेक्षा जास्त वनक्षेत्र आहे. वन क्षेत्रात हजारो वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येते. प्रत्यक्ष आकडेवारीचा अनेकदा मेळ नसल्याने कोणते प्राणी किती याची निश्चित माहिती वनविभागाकडेही उपलब्ध नाही. यंदा झालेल्या अल्प पावसामुळे जंगलांमध्ये असलेले नैसर्गिक तलाव तसेच जलसाठे जानेवारीतच आटले.
जालना तालुक्यात ८ पेक्षा अधिक पाणवठे आहेत. यात जालना शहर परिसरात दोन, दरेगाव वन शिवारात ४, हदगाव २, बावणेपांगरी एक असे पाणवठे आहेत. चार तालुके मिळून १४ वनतळे बांधण्यात आली आहेत. गरजेनुसार येथे पाणीपुरवठा केला जातो.
उत्तर विभागात जालना, बदनापूर, जाफराबाद व बदनापूर हे तालुके येतात. या चार तालुक्यांत हरणे, कोल्हे, लांडगे, मोर व नील गायी आहे. याची मोजणी नसली तरी हे प्रमाण हजारोंच्या घरात असल्याचे वन अधिकारी एम.आर. निकुंभ यांनी सांगितले. काही सामाजिक संघटनाही वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात मंगळवारी बिबट्या सदृश वन्यप्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे आला होता. त्याच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले होते. प्रत्यक्षात हा प्राणी बिबट्याऐवजी तडस असावा, असा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी २० वन कर्मचाऱ्यांनी चनेगाव शिवाराचा संपूर्ण परिसर पिंजून काढत या प्राण्याचा शोध घेतला. बुधवारी सकाळी तेथे पिंजरा लावण्यात आला.
४त्या ठिकाणी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्राण्याचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान, मंगळवारी चनेगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेतल्यानंतर बिबट्याने धामणगाव शिवाराकडे धूम ठोकली, असे कडूबा तायडे, अनिल तायडे, कृष्णा घुगे, ज्ञानेश्वर गुळमकर, गणेश मुटकूळे जगन मुटकूळे या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असले तरी वनविभागाचा दावा वेगळा असल्याचे सांगण्यात आले.
४बिबट्या सदृश प्राणी बुलडाणा जिल्ह्यातील धाड वा इतर गावातून तसेच भोकरदनच्या सीमेवरील धावडा, मेहगाव, जाळीचा देव जंगलातून आला असावा. दोन दिवसांपासून रेकी सुरू आहे. लवकरच या प्राण्याचा आम्ही शोध लावू असा दावा वन अधिकारी निकुंभ यांनी केला. चनेगाव शिवारात हिंस्त्र श्वापद लक्षात घेता एकाट्याने फिरू नये गटागटाने जावे, काही आढळ्यास वन विभागाशी संपर्क साधावा.

Web Title: If you are in the city, then you will be scared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.