काही करीत नसाल, तर निदान मुले तरी जन्माला घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:58 AM2018-02-20T00:58:57+5:302018-02-20T01:00:18+5:30
जे लोक देशासाठी काहीच करीत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे, असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इतर धर्मीयांचे वर्चस्व रोखण्यासाठी व हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे. जे लोक देशासाठी काहीच करीत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे, असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला. जनूभाऊ रानडे यांचा दहावा स्मृतिदिन व शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंचावर डॉ. विभाश्री, अंबरीश महाराज, नवनाथ महाराज, डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य, शिवाजी शेरकर, राजीव जहागीरदार, संजय बारगजे आदी उपस्थित होते.
संत तुकाराम नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात ‘भगवा रंग त्यागाचा’ या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, मुलांच्या भरणपोषणाची क्षमता नाही म्हणून एकाच मुलावर थांबण्याचा निर्णय घेऊ नका. बाहेरून आलेल्या कित्येक लोकांना नाही तरी आपण देशात खाऊ-पिऊ घालतच आहोत. तुमच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. हिंदूंची लोकसंख्या वाढली नाही, तर आगामी काळात इतर धर्म अतिक्रमण करून हिंदूंच्या अस्तित्वावर धोका आणतील, असा इशाराही त्यांना दिला.
शिवाजी महाराजांनी सहा लग्न केल्याचा दाखला देत प्रज्ञासिंह यांनी देशासाठी एकापेक्षा अधिक लग्न
केले तरी चालेल, असे वक्तव्य
केले. मुलांना बहीण-भाऊ
नसल्यामुळे आजकाल मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असून, आत्महत्या वाढत असल्याचाही निष्कर्ष काढत त्यांनी मुलांच्या संख्येवरून वाद होणे योग्य नसल्याचे म्हटले.
विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणा-या महिलांचा यावेळी ‘मातृशक्ती सन्मान’ करण्यात आला. अर्पण पतंगे या शाळकरी विद्यार्थ्याने पोवाडा सादर केला, तर पार्थ
बावस्कर यांनी सूत्रसंचालन
आणि हेमंत त्रिवेदी यांनी आभार मानले.
भगव्या रंगाला दहशतवादाचा ठपका लावणे एका मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याचे सांगत प्रज्ञासिंह यांनी भगवा हा ‘त्याग, समर्पण आणि शौर्याचा’ रंग असल्याचे म्हटले. देशविरोधी आणि मनात कपट बाळगणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रखर राष्ट्रवादाला घाबरतात. भगवा रंग म्हणजे या प्रखर राष्ट्रवादाचे प्रतीक आहे, असेही त्या म्हणाल्या.