दूध मागितले तर लगेच मिळते; परंतु पाण्यासाठी सातारा-देवळाईकरांचा संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 07:18 PM2022-03-23T19:18:31+5:302022-03-23T19:20:46+5:30
पाणीपुरवठ्याच्या टँकरसाठी आगाऊ रक्कम मोजली तरच तेही दिवसाआड येते. ३० दिवसांचे पैसे घेऊन १५ च दिवस पाणीपुरवठा मनपाकडून केला जातो.
औरंगाबाद : उन्हाचा पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअस पार करू लागला, तशा पाण्याच्या झळा देखील सातारा- देवळाईकरांना बसू लागल्या. बोअरवेलची पातळी बुडापर्यंत जाऊन पोहोचली. एक वेळेस दूधवाल्याला दूध मागितले तर तो लगेच देतो, परंतु पाण्याच्या जारची गाडी थांबवून ‘एक जार दे रे भाऊ’ म्हटले तरी शिल्लक नाही म्हणून तो निघून जातो, ही वस्तुस्थिती आहे.
शासनाच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकणे तसेच जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेतले असले तरी ‘घागर रिकामी रे गोविंदा’ असेच म्हणण्याची वेळ सातारा- देवळाईतील नागरिकांवर येऊन ठेपलेली आहे. पाणीपुरवठ्याच्या टँकरसाठी आगाऊ रक्कम मोजली तरच तेही दिवसाआड येते. ३० दिवसांचे पैसे घेऊन १५ च दिवस पाणीपुरवठा मनपाकडून केला जातो.
जारवाल्यांचीच चलती..
चार पाहुणे घरी आले अन् पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अधिकचा जार मागितला तर नकार दिला जातो. दूध एक वेळ त्वरित मिळते, परंतु जारवाला धुडकावून लावतो, याकडे कुणाचेही लक्ष नाही. सातारावासीयांना किमान जल दिनी तरी ‘पाणी पाजा हो’ असेच म्हणायची वेळ आली आहे.
- अनंत सोन्नेकर
गरीब कुटुंबीयाला मनपाने मोफत पाणी द्यावे...
सातारा- देवळाईतील बहुतांश कुटुंबे टँकरचे पाणी विकत घेऊ शकत नाहीत, अशा कुटुंबीयांना मनपाच्या वतीने मोफत पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. सर्वात जास्त महसूल याच परिसरातून घेतला जातो. अशा मजूर गरीब कुुटुंबाची तहान उन्हाळ्यात भागवावी, अशी मागणी आहे.
- हरिभाऊ राठोड