एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा
By बापू सोळुंके | Published: June 22, 2024 05:32 PM2024-06-22T17:32:40+5:302024-06-22T17:33:04+5:30
मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, मनोज जरांगेंचा सवाल
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने शोधून काढलेल्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते करीत आहेत. त्यांचे ऐकून एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील, अशा शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला.
वडिगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सोडविताना राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या खोट्या कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करीत, त्या रद्द करण्याची मागणी केली. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मंत्री होते. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला.
सरकारला महागात पडेल
ते म्हणाले की, आमची एकही नोंद खाेटी नाही. मात्र, त्यांचे ऐकून नोंदी रद्द करणार असाल तर हे चूक आहे. कुणबी नोंदी रद्द करणे सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझा समाजासाठी जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या समाजाच्या लेकरांसाठी लढणं सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते सरकारपुरस्कृत उपोषण
वडिगोद्री येथे उपोषणाला बसलेले त्यांचे पंटर असल्याचे भुजबळ यांनी जाहीरपणे सांगितले. यावरून हे सरकारपुरस्कृत उपोषण असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. ज्या प्रकारे ओबीसी नेते एकत्र झाले, त्याची दखल घेऊन विविध राजकीय पक्षांतील मराठा नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन जरांगे यांनी केले. तुम्ही एकत्र आला नाही तर मराठा लेकरांचे वाटोळे होईल, असेही ते म्हणाले.
काेयत्याने हातपाय तोडण्याची त्यांची भाषा कशी आहे?
भुजबळांविषयी आपल्या एकेरी भाषेविषयी कुणबी नेते तायवाडे शनिवारी बोलले. तायवाडे हे मोठे नेते आहेत, त्यांनी समान न्याय करणे अपेक्षित आहे. तुम्ही ज्या व्यासपीठावर होता तेव्हा ओबीसी नेत्यांनी हातपाय तोडण्याची भाषा केली होती. शिव्या दिल्या होत्या. आता मी बोललो तर तुम्हाला खालची भाषा वाटते, असा सवाल जरांगे यांनी केला.
भुजबळ हे धनगर आणि मराठा समाजात वाद लावत आहेत
आमच्या नोंदी सापडल्यामुळे धनगर बांधवांचं काय नुकसान झालं? धनगर समाजाला मिळालं तेव्हा आम्ही कुठे विरोध केला. मग का धनगर समाज आमच्या विरोधात जात आहे, असा सवाल करीत भुजबळ हे धनगर आणि मराठा समाजात वाद लावत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.