‘औकात नसेल तर गाडी कशाला घेतली’ वसुली एजंटाची कर्जदारास शिवीगाळ, पहाटे नेली गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 04:54 PM2021-12-09T16:54:09+5:302021-12-09T16:56:01+5:30
वसुली एजंटने हप्ते थकल्यामुळे पहाटेच घरातून दुचाकी नेली असून याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
- राम शिनगारे
औरंगाबाद : एका कामगाराने हिरो कंपनीच्या दुचाकीसाठी हिरो फायनान्सकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे पाच हप्ते थकल्यामुळे वसुलीसाठी नेमलेल्या एजंटांच्या माणसांनी कामगाराच्या घरी येऊन बायकोसोबत हुज्जत घालून ‘औकात नसेल तर गाडी कशाला घेतली,’ असे हिणवून शिवीगाळ केली. त्यानंतर गाडी उचलून नेण्यात आली. तेव्हा कामगाराने पैसे भरण्यासाठी कार्यालयाची माहिती विचारताना झालेल्या बाचाबाचीत एजंटाने अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.
हेडगेवार हॉस्पिटलजवळील शैलेंद्र मुधिराज यांनी पत्नीच्या नावावर हिरो कंपनीची दुचाकी (एमएच २० एफके १६७६) विकत घेतली. त्यासाठी २० हजार रुपये डाऊनपेमेंट करण्यात आले. उर्वरित रकमेसाठी हिरो फायनान्सकडून कर्ज घेण्यात आले. या कर्जाच्या हप्त्यासाठी २६८७ रुपये प्रतिमहिना द्यावे लागणार होता. कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यामुळे मागील पाच महिन्यांपासून हप्ते थकले होते. त्यामुळे वसुली एजंटांनी पैशाची मागणी केली होती. दोन हप्ते भरण्याची तयारी शैलेंद्र यांनी दाखवली होती. मात्र, सर्वच हप्ते भरण्याचा आग्रह एजंटांनी केला. ३ रोजी पहाटे वसुली एजंट योगेश भारसाखळे याच्या तीन माणसांनी दुचाकी उचलून नेली. गाडी घेऊन गेल्यानंतर पावणेसात वाजता जवाहरनगर पोलीस ठाण्यास मेलद्वारे गाडी उचलून नेल्याचे कळविण्यात आले. गाडी गेल्यानंतर तीन दिवसांत मुधिराज यांनी हप्ते भरण्यासाठी पैसे गोळा केले. त्यासाठी त्यांनी कोणत्या कार्यालयात पैसे भरायचे, अशी विचारणा भारसाखळेकडे केली. बोलाचालीचे रूपांतर बाचाबाचीत झाले. भारसाखळे यांनी मुधिराज यांना अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीची ऑडिओ रेकॉर्डिंगही मुधिराज यांच्याकडे आहे. त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. भारसाखळे विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. याविषयी भारसाखळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत होता.
वाहन नेण्याच्या वेळेचा नियम
कोणत्याही गाडीमालकाकडे हप्ते थकलेले असतील तर कामाची वेळ असलेल्या सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान वसुलीसाठी वाहन ताब्यात घेण्याचा नियम आहे. मात्र, हिरो फायनान्सच्या वसुली प्रतिनिधींनी सकाळी ६ वाजताच मुधिराज यांच्या घरी जाऊन गाडी उचलून आणली. त्याचा मेलही सकाळी पावणेसात वाजता पोलिसांना टाकल्याचे उपलब्ध रेकॉर्डवरून स्पष्ट झाले.
शिवीगाळ करू शकत नाही - सोनवणे
फायनान्सची बाजू जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आकाश सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आमचे वसुली एजंट शिवीगाळ करू शकत नाहीत, असा दावा केला. तसेच याविषयी माझ्याऐवजी विभागाचे व्यवस्थापक असलेल्या प्रभाकर कोल्हे यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला त्यांनी दिला. मात्र, त्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही.