वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास मिळणार 'या' योजनेचा आधार ! अर्ज प्रक्रिया सुरू
By विजय सरवदे | Published: June 20, 2024 05:57 PM2024-06-20T17:57:49+5:302024-06-20T17:58:06+5:30
४५० विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार केली जाणार निवड
छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती, नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेच्या धरतीवर शासनाने आता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक पी.जी. वाबळे यांनी कळविले आहे की, बारावी उत्तीर्ण ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत. असे विद्यार्थी निवास व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षाच्या १५०, तृतीय वर्षाच्या १५० आणि चतुर्थ वर्षाच्या १५० अशा एकूण ४५० विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे.
काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना?
राज्यातील गरजू आणि आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक साहाय्य देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार?
या योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (‘क’ वर्ग मनपा क्षेत्र) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्त्यापोटी ५१ हजार रुपये मिळणार आहेत.
ही कागदपत्रे लागणार
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवर्गाचा जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, १२वीचे गुणपत्र, बँक खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
१५ जुलैपर्यंत करा अर्ज
या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १५ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.
कोठे करायचा अर्ज?
छत्रपती संभाजीनगर शहरातील खोकडपुरा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक कार्यालयात ऑफलाइन अर्ज करता येईल.