तूर डाळ न उचलल्यास साखर मिळणार नाही
By Admin | Published: September 12, 2016 11:13 PM2016-09-12T23:13:21+5:302016-09-12T23:22:11+5:30
औरंगाबाद : तूर डाळ न उचलल्यास साखर देणार नाही, या तहसीलदारांच्या भूमिकेविरुद्ध स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
औरंगाबाद : तूर डाळ न उचलल्यास साखर देणार नाही, या तहसीलदारांच्या भूमिकेविरुद्ध स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. स्वस्तात देण्यात येणारी तूर डाळ प्रत्यक्षात महागात पडत असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांकडून ती उचलली जात नाही. तूर डाळीची उचल करावी अशी सक्ती तहसीलदार करीत आहेत. हे होत नाही, तोपर्यंत साखरेचे परमिट देण्यात येणार नाही, असा निर्णयही तहसीलदारांनी घेतला आहे.
हा प्रकार योग्य नसल्याचे सांगण्यासाठी आज राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक महासंघाचे अध्यक्ष डी.एन. पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
रेशन दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या तूर डाळीत १५ टक्के डाळ ही सोयाबीन व हिरव्या वाटाण्याची आहे. तूर डाळ शिजण्यासाठी जितका वेळ लागतो, त्यापेक्षा अधिक वेळ रेशनमधून उपलब्ध तूर डाळ शिजण्यासाठी लागत आहे. त्यामध्ये रेशनची डाळ घेण्यास टाळाटाळ होत आहे. परिणामी ही डाळ दुकानांमध्ये तशीच पडून आहे. याचा भुर्दंड दुकानदारांना सहन करावा लागत असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
शासनाने औरंगाबाद शहरातील सहा मॉलमध्ये ९४ रु. किलोप्रमाणे तूर डाळ उपलब्ध करून दिली. दुसरीकडे रेशनची तूर डाळ १०३ रु. प्रतिकिलो आहे, तर खुल्या बाजारातील तूर डाळ ८० ते ९० रु. किलोने उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिक स्वस्त म्हणून खुल्या बाजारातीलच तूर डाळ खरेदी करीत आहेत.