'पोलिसांत गेलात तर तुमचे गाडीसारखे हाल करेन'; ३ गाड्या ठोकून मद्यधुंद कारचालकाची अरेरावी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:55 PM2024-09-30T12:55:17+5:302024-09-30T12:57:06+5:30

आठ दिवसांत ‘हिट ॲण्ड रन’ची तिसरी घटना : मद्यधुंद कारचालकाने भर दुपारी उभ्या तीन गाड्या ठोकल्या, वाहनांचा अक्षरश: चक्काचूर

'If you go to the police, I will hit you like a accidental car'; Drunken driver threats after crashes 3 cars | 'पोलिसांत गेलात तर तुमचे गाडीसारखे हाल करेन'; ३ गाड्या ठोकून मद्यधुंद कारचालकाची अरेरावी

'पोलिसांत गेलात तर तुमचे गाडीसारखे हाल करेन'; ३ गाड्या ठोकून मद्यधुंद कारचालकाची अरेरावी

छत्रपती संभाजीनगर : एपीआय कॉर्नरकडून ठाकरेनगर, सिडको एन-२ च्या रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या मद्यधुंद कारचालकाने रविवारी दुपारी २:४५ वाजेच्या रस्त्याच्या बाजूला घरासमोर उभ्या तीन गाड्यांना ठोकले. गाडीचा वेग जास्त असल्याने तीन वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. मागील आठ दिवसांमध्ये ‘हिट ॲण्ड रन’ची तिसरी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कोडा कार (एमएच ४६ एक्स ४४७२) एपीआय कॉर्नर येथील पंपावर इंधन भरल्यानंतर सिडको एन-२ ठाकरेनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाली. काही अंतरावर मद्यधुंद कारचालकने गाडीचा वेग वाढवला. तेव्हा चालकाच्या बाजूने रस्त्याच्या कडेला उभ्या विलास राठोड यांच्या मालकीच्या फियाट कारला (एमएच ०२ बीवाय ७९८८) पाठीमागून जोराची धडक दिली. त्या धडकेमुळे उभी कार समोरील भिंतीवर आदळली. त्यात दोन्ही बाजूने गाडीचा चेंदामेंदा झाला. त्या गाडीला धडकल्यानंतर भरधाव कार डाव्या बाजूने जात ताराचंद कोल्हे यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीवर (एमएच २० सीएच ४३१३) जोरात आदळली. या धडकेत स्विप्ट गाडी समोरच्या झाडावर जाऊन आदळली. त्यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. 

ही धडक एवढी भीषण होती की, स्कोडा कारमधील एअर बॅग उघडल्या. त्यामुळे कारमधील पाच जण बचावले. त्याचवेळी भरधाव कारने रूपाली पाटील यांच्या ॲक्टिव्हाला (एमएच २० सीएम ११९६) धडक दिली. त्यात गाडीच्या पाठीमागील भागाचे नुकसान झाले. या अपघातानंतर भरधाव गाडीतील पाचजण खाली उतरले. त्यातील चौघेजण पळून गेले. मद्यधुंद गाडी मालक व चालक अविनाश कांतीलाल शिंदे (२२, रा. ५६ नंबर रेल्वे गेट, राजनगर, मुकुंदवाडी) यास नागरिकांनी पकडले. या प्रकरणी ताराचंद कोल्हे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुकुंदवाडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

...तर तुमचे गाडीसारखे हाल करेन
मद्यधुंद कारचालक गाडीतून खाली उतरल्यानंतर उपस्थित नागरिकांसह महिलांनाच धमकावत होता. पोलिसात तक्रार दिली तर जसे तुमच्या गाडीचे हाल झाले, तसे तुमचेही करेन. कुठेही तक्रार करू नका, तुमच्या गाडीची नुकसानभरपाई करून देतो, अशीही बडबड करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

गाडीसमोर झाड नसते तर...
रस्त्याच्या कडेला उभ्या स्विफ्ट डिझायर गाडीच्या समोर माेठे झाड होते. त्या झाडाखाली तीन मुले खेळत होती. त्याचवेळी मनपाच्या नळाला पाणी आले म्हणून दोन-तीन महिला पाणी भरत होत्या. भरधाव गाडीने उभ्या गाडीला धडक दिल्यानंतर ती जोरात झाडावर आदळून त्याच ठिकाणी दोन्ही गाड्या अडकल्या. त्यामुळे झाडाखाली खेळणारे मुले बालंबाल बचावली. गाडीसमोर झाड नसते तर अनेकांना जीव गमवावा लागला असता, असेही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

पाइप जाळून पोलिसांचा निषेध
घटनास्थळी मद्यधुंद चालक महिलांसह इतरांना अरेरावी करीत होता. तेव्हा नागरिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांना येण्यास तब्बल दीड तास उशीर झाल्यामुळे माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे, सोमनाथ बोंबले यांच्यासह नागरिकांनी पेट्रोल टाकून रस्त्याच्या कडेला ठेवलेले पाइप पेटवून निषेध नोंदवला. त्याचवेळी त्या रस्त्यावर गतिरोधक उभारण्यासह अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केली. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. शेवटी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांच्यासह पोलिस घटनास्थळी पोहोचत अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा केला.

आठ दिवसांतील घटना
- २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता एका मद्यधुंद कारचालकाने आकाशवाणी चौकात सहा गाड्यांना धडक दिली. सिंधी कॉलनीत अंधारात गाडी उभी करून पळून गेला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.
- २८ सप्टेंबर रोजी निराला बाजार परिसरात पार्किंगमध्ये उभ्या आठ दुचाकींवर एका महिला कारचालकाने गाडी घातली. एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला.
- २९ सप्टेंबर रोजी सिडको, एन-२ ठाकरेनगर भागात भरधाव कारचालकाने तीन वाहनांना धडक दिली.

Web Title: 'If you go to the police, I will hit you like a accidental car'; Drunken driver threats after crashes 3 cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.