‘करोगे याद, तो हर बात याद आयेगी...'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:16 PM2019-07-09T13:16:37+5:302019-07-09T13:25:10+5:30
औरंगाबादचे भूषण, शायर बशर नवाज यांचा आज चौथा स्मृतिदिन.यानिमित्त कविवर्य प्रा. फ. मुं. शिंदे यांनी त्यांच्या जागविलेल्या आठवणी.
बशर नवाज हे आमचे परम मित्र होते. माणूस म्हणूनही ते अतिशय सद्गुणी होते. जुन्या- नव्या कवींवर प्रेम करणं, त्यांच्याकडूनच शिकायला पाहिजे. खरं तर देशभर कीर्ती कमावलेला हा मराठवाड्यातला माणूस आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होय. सामाजिक धारणेच्या आणि त्याबरोबरच उत्कट प्रेमाच्याही नितांत सुंदर कविता बशर नवाज यांनी लिहिल्या. हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली मोजकीच; परंतु महत्त्वपूर्ण अशी गाणीही कवितेच्या अंगानंच लिहिली.
‘बाजार’ मधील त्यांची रचना,
‘करोगे याद, तो हर बात याद आयेगी,
गुजरते वक्त की हर मौज ठहर जायेगी’
अशा रचनांमधून त्यांनी पायाभूत अशा काही गोष्टी मांडून ठेवल्या.
बशर नवाज यांना कधीही प्रसिद्धीचा सोस नव्हता. स्वत:चं मोठेपण विसरून ते अवती-भवतीच्या सामान्य मित्रांमध्ये एकरूप होत. असा उर्दूचा शायर आणि भारताचा कवी आज राहिला नाही, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. याचं कारण असं की, हा कवी त्याच्या काव्यातून अजरामर झालेला आहे. अतिशय सोप्या उर्दूतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सार्वजनिक कार्यक्रम किंवा मित्रांची एखादी खाजगी मैफल असो ते सारखेच रंगून जायचे. हिंदीमधले महान लेखक व दिग्दर्शक सागर सरहद्दी यांच्यासाठी बशर नवाज यांनी गीतलेखनाचं काम केलं. पण त्यांनी औरंगाबाद शहर हे कधीही सोडलं नाही. इथं बसूनच ते जगाशी संवाद करीत असत. म्हणून आज ते आहेत, नाहीत, हा प्रश्नच उद्भवत नाही. ते सगळ्यांच्या अंत:करणात आहेतच. मी त्यांची आठवण करतो.