चांगले उपचार हवेत, तर पैसे भरा; योजनेत मोफत उपचार, तरीही होतोय रुग्णांचा खिसा रिकामा
By संतोष हिरेमठ | Published: October 14, 2023 06:16 PM2023-10-14T18:16:18+5:302023-10-14T18:17:06+5:30
योजनेंतर्गत मिळणाऱ्या संपूर्ण मोफत सुविधेविषयी कसलीही अडचण असल्यास रुग्णांनी आरोग्य मित्राशी संपर्क साधावा
छत्रपती संभाजीनगर : आरोग्य योजनेतील पॅकेजमधून क्वालिटीचे इम्प्लांट, सर्जिकल साहित्य मिळणार नाही. चांगले साहित्य पाहिजे असेल तर थोडे पैसे भरावे लागतील. रुग्णासाठी थोडा विचार करा, असे म्हणत रुग्णांचा, नातेवाइकांचा खिसा रिकामा करण्याचा प्रकार काही खाजगी रुग्णालयांमध्ये सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोग्य योजनेत पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतलेला असताना अनेक बाबी पुढे करून योजनेतील रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे उकळले जात आहे. योजनेत जे पॅकेज आहे, त्यातून चांगले उपचार, शस्त्रक्रिया करता येत नसल्याचे कारण काही ठिकाणी पुढे केले जात आहे. रुग्णाचा विचार करून नातेवाईक पैसे मोजून मोकळे होत असल्याची परिस्थिती आहे. योजनेमध्ये आजार बसतो की नाही व योजनेमध्ये आजार बसत असेल तर योजनेंतर्गत मिळणाऱ्या संपूर्ण मोफत सुविधेविषयी कसलीही अडचण असल्यास रुग्णांनी आरोग्य मित्राशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.
वर्षभऱात किती शस्त्रक्रिया,किती दावे मंजूर?
१ एप्रिल २०२२ ते ९ मार्च २०२३ या कालावधीदरम्यान एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयांमध्ये २५ हजार ५७७ लाभार्थ्यांनी ५१ हजार २५१ शस्त्रक्रिया उपचाराचा लाभ घेतला. त्यासाठी योजनेंतर्गत १४८ कोटी ९८ लाख ५३ हजार ४६६ रुपयांचे दावे मंजूर झाले.
योजनेतील साहित्य स्टँडर्ड
योजनेतील रुग्णांसाठी जे साहित्य वापरले जाते, ते स्टँडर्ड असतात. योजनेत उपचार होत असताना पैशांची मागणी होत असेल तर आरोग्य मित्रांकडे तक्रार करावी. तक्रार केल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करता येते.
- डाॅ. मिलिंद जोशी, जनआरोग्य योजना जिल्हा व्यवस्थापक
योजनेतील स्क्रू क्वाॅलिटीचे नाहीत म्हणाले
जवळच्या व्यक्तीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी योजनेतून क्वाॅलिटीचे स्क्रू मिळणार नाही, असे एका रुग्णालयात सांगण्यात आले. क्वाॅलिटीचे स्क्रू हवे असतील तर वेगळे पैसे भरावे लागतील, असे सांगितले. यासंदर्भात मी हेल्पलाइनवर तक्रार केली.
- ॲड. राजेंद्र राठोड
पॅकेजचा खर्च वाढविणे गरजेचे
चांगल्या उपचारासाठी योजनेतील पॅकेजचा खर्च वाढविणे गरजेचे आहे. योजनेतील रुग्णांकडून रुग्णालयांनी पैसे घेता कामा नये. रुग्णांच्या नातेवाइकांनी देखील पैसे देता कामा नये.
- डाॅ. अजित भागवत, ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ
- जिल्ह्यात योजनेशी संलग्नित रुग्णालये- एकूण ३८