पर्मनंट लायसन्स हवे, तर मग आधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:05 AM2021-07-26T04:05:07+5:302021-07-26T04:05:07+5:30
आजपासून करोडीत चाचणी : लाचेच्या कारवाईनंतर वरिष्ठांचा निर्णय औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने पर्मनंट लायसन्ससाठी घेण्यात येणारी चाचणी २६ जुलैपासून ...
आजपासून करोडीत चाचणी : लाचेच्या कारवाईनंतर वरिष्ठांचा निर्णय
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने पर्मनंट लायसन्ससाठी घेण्यात येणारी चाचणी २६ जुलैपासून करोडीतील जागेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून पर्मनंट लायसन्स हवे असेल तर आता वाहनचालकांना १८ कि.मी. चा प्रवास करून करोडी गाठावे लागणार आहे.
ड्रायव्हिंग स्कूलमधील प्रशिक्षणार्थींचे पर्मनंट लायसन्स मंजूर करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी सहायक प्रादेशिक परिहवन अधिकारी आणि एक व्यक्ती काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात रंगेहात सापडले. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरटीओ कार्यालयाने पर्मनंट लायसन्ससाठी घेण्यात येणारी चाचणी कार्यालयाबाहेरील सार्वजनिक रस्त्यावर घेण्याचा निर्णय घेतला होता. पण काही दिवसांतच सार्वजनिक रस्त्याऐवजी पैठण रोडपासून काही अंतरावरील निर्मनुष्य अशा रस्त्यावर ही चाचणी घेतली जात होती. परंतु या ठिकाणी होणाऱ्या चाचणीवर लाचेच्या कारवाईनंतर शंका उपस्थित करण्यात येत होती.
निर्मनुष्य अशा रस्त्यावर चाचणी घेतलेल्यांची कार्यालयातील ट्रॅकवर चाचणी घेतली तर ९० टक्के उमेदवार नापास होतील, असा दावा होत होता. याप्रकाराची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी पर्मनंट लायसन्सची चाचणी सोमवारपासून करोडी येथील आरटीओ कार्यालयाच्या जागेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.