नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्तीसाठी दुर्लक्ष; शैक्षणिक वर्ष संपत आले, हजारो अर्ज प्रलंबित
By विजय सरवदे | Published: March 27, 2024 02:02 PM2024-03-27T14:02:03+5:302024-03-27T14:02:06+5:30
आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
छत्रपती संभाजीनगर : भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वेळेवर दिली जात नाही, अशी आवई उठविली जाते. परंतु, महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून हे अर्ज दाखल करण्यास हलगर्जीपणा केला जात आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्ती अर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही जिल्ह्यातील सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. यासाठी आता ३१ मार्चपर्यंत अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली होती. चालू शैक्षणिक वर्षात ११ ऑक्टोबरपासून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी समाज कल्याण विभागाने ‘महाडीबीटी पोर्टल’ सुरू केले. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर भरलेल्या अर्जांची पडताळणी करून महाविद्यालयांनी ते समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड करायचे असतात; पण प्रामुख्याने काही नामांकित महाविद्यालयांना त्यासाठी वेळ मिळत नसल्याचे प्रलंबित अर्जांच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी २० हजार ८७४ अर्ज महाविद्यालयांकडून समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड झाले. प्राप्त अर्जांपैकी २० हजार ८७१ अर्ज समाज कल्याण विभागाने मंजूर केले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत जवळपास ८ हजार अर्ज अजूनही अप्राप्त आहेत. विद्यार्थी व महाविद्यालयांना या दोघांसाठीही आता ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे.
महाविद्यालय जबाबदार
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी महाविद्यालयांना इशारा दिला आहे की, शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयांची असेल. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन त्याची छाननी करावी व परिपूर्ण अर्ज ३१ मार्चपूर्वी समाज कल्याण विभागाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करावेत.
- २९,६५३ विद्यार्थ्यांना गत वर्षी शिष्यवृत्तीचे वाटप
- २०,८७४ विद्यार्थ्यांचे अर्ज आतापर्यंत समाज कल्याणला प्राप्त
- ४,१८६ अर्ज महाविद्यालयांच्या लॉगिनवर पडून
- ४००० विद्यार्थ्यांनी अजूनही अर्जच भरलेले नाहीत.