मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात विद्यापीठाचे पद्मविभूषण विजेत्याकडे दुर्लक्ष
By राम शिनगारे | Published: July 24, 2023 01:59 PM2023-07-24T13:59:28+5:302023-07-24T14:01:57+5:30
पद्म गौरव सन्मानाचे पडसाद; विद्यापीठ विद्यार्थी, भूमिपुत्रांना विसरले, बाहेरच्यांना बोलावून केले सन्मानित
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार्थींचा सन्मान सोहळा शनिवारी पार पडला. या सोहळ्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात लढ्यातील अग्रणी एकमेव पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, भूमिपुत्रांचाच प्रशासनाला विसर पडला. मराठवाड्याबाहेरील व्यक्तींना बोलावून सन्मान केला जातो, मात्र भूमिपुत्रांनाच उपेक्षित ठेवल्यामुळे आता वादविवाद सुरू झाले आहेत.
विद्यापीठ प्रशासनातर्फे आयोजित पद्म गौरव सोहळ्यात काेकणातील दादासाहेब इदाते, पुण्यातील गिरीश प्रभुणे, मुंबईतील रमेश पतंगे यांच्यासह शहरातील डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. यु. म. पठाण, डॉ. गंगाधर पानतावणे, फातेमा झकेरिया, बीड जिल्ह्यातील शब्बीर सय्यद यांच्यासह पद्मश्री पुरस्कार नसणारे कृषितज्ज्ञ श्रीरंग लाड यांना सन्मानित केले. पठाण, झकेरिया आणि पानतावणे यांच्या आप्तस्वकीयांनी सन्मान स्वीकारला. लातूरचे पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, साेयगावचे कवी ना. धो. महानोर यांची अनुपस्थिती होती. या सन्मानकर्त्यांची कोणत्या निकषाच्या आधारे निवड केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामचे अमृतमोहत्सवी वर्ष सुरू आहे. या वर्षात राज्य शासनाने कोट्यवधींचा निधी देत विविध ठिकाणी मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे आदेश दिले. त्याचवेळी या लढ्यातील अग्रणी पद्मविभूषण पुरस्कार मिळणारे मराठवाड्यातील एकमेव गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह भूमिपुत्रांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाला राज्यपाल भवनातूनच पुरस्कार्थींची नावे देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
या महनीय व्यक्तींकडे दुर्लक्ष
गोविंदभाई यांच्यासह शहरातील प्रसिद्ध शायर पद्मश्री सिकंदर अली वज्द, पद्मभूषण फरीद झकेरिया, पखवाज वादनाला सातासमुद्रापार घेऊन जाणारे बीड जिल्ह्यातील शंकरबापू आपेगावकर, विद्यापीठाचे विद्यार्थी नाट्यदिग्दर्शक डॉ. वामन केंद्रे, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, मराठवाड्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे नांदेडचे शामराव कदम यांचाही विद्यापीठ प्रशासनाला विसर पडला आहे.
'सेलेक्टिव्हिझम' कोणाच्या सांगण्यावरून
विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांच्या पुढाकाराने पद्म पुरस्कारार्थींचा सन्मान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आला. कुलगुरू महोदय, मराठवाड्याचा मुक्तीलढा आपण विसरला आहात. या लढ्यातील नायक गोविंदभाई श्रॉफ यांच्या कुटुंबीयांचा विसर तुम्हाला पडला. हे 'सेलेक्टिव्हिझम' कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले? याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल.
-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद