लेखा परीक्षणातील त्रुटी दूर करण्याकडे दुर्लक्ष
By Admin | Published: July 17, 2017 12:07 AM2017-07-17T00:07:30+5:302017-07-17T00:11:13+5:30
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध कंत्राटदारांमार्फत करण्यात आलेल्या कामांच्या अनुषंगाने झालेल्या लेखा परीक्षणात गंभीर त्रुटी आढळून आल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध कंत्राटदारांमार्फत करण्यात आलेल्या कामांच्या अनुषंगाने झालेल्या लेखा परीक्षणात गंभीर त्रुटी आढळून आल्या असतानाही त्या त्रुटी दूर करण्याकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याची बाब समोर आली आहे़
कृषी विद्यापीठात कंत्राटदारांमार्फत विविध कामे करून घेण्यात येतात़ असे असताना संबंधित कंत्राटदारांनी त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे हजेरी पट व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे़ परंतु, या कंत्राटदारांनी हजेरीपट न ठेवताच मोघम स्वरुपात मजुरांची नावे टाकून रक्कम उचलल्याची बाब २०१२-१३ या वित्तीय वर्षाचे लेखा परीक्षण करीत असताना प्रशासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आली़ नमुना दाखल सांगायचे तर नांदेड येथील कृषीतंत्र महाविद्यालयात २०१२-१३ या वर्षात ४१ कामांची ४ लाख ३६ हजार ८८० रुपयांची देयके देण्यात आली़ ही देयके देत असताना महाराष्ट्र कृषी विद्यापीठ लेखासंहिता १९९१ चे नियम ११-९, ८ अन्वये मजुरांनी प्रक्षेत्रावर कोणते काम केले? याचा दैनंदिन तपशील ठेवणे आवश्यक असताना मोघम स्वरुपात रजिस्टर ठेवण्यात आले़ या संदर्भात खुलासा करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले़ त्यामुळे या कंत्राटदारांना देण्यात आलेल्या ४ लाख ३६ हजार ८८० रुपयांच्या रकमेच्या अनुषंगाने खुलासा करावा, असे लेखा परीक्षणात नमूद करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे़ तशीच बाब अन्नतंत्र महाविद्यालयात करण्यात आलेल्या कामात आढळली आहे़ येथे ७२ हजार २६४ रुपये एका कंत्राटदाराला अदा करण्यात आले़ सदरील काम नोंदणीकृत कंत्राटदाराकडून न करून घेता इतरांकडून करून घेण्यात आले़ तसेच रोजंदारीचे दर ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे देण्यात आले नाहीत, असेही या लेखा परीक्षणातील त्रुटीमध्ये नमूद करण्यात आले आहे़ (समाप्त)