धोक्याकडे दुर्लक्ष! ‘दख्खन का ताज’वर उगवली झाडी, डझनभर ठिकाणी भेगा
By संतोष हिरेमठ | Published: August 3, 2023 08:13 PM2023-08-03T20:13:56+5:302023-08-03T20:15:55+5:30
गतवर्षी झाड वाढलेला भाग कोसळला, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च
छत्रपती संभाजीनगर : ‘दख्खन का ताज’ अशी ओळख असलेल्या जगप्रसिद्ध ‘बीबी का मकबरा’च्या संवर्धनासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र त्यानंतरही हा ऐतिहासिक वारसा धोक्यात येत आहे. आजघडीला जवळपास १२ पेक्षा अधिक ठिकाणी झाडीझुडपी वाढली आहेत. मात्र, ही झाडी वेळीच हटविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ठिकठिकाणी भेगाही पडल्या आहेत. त्यातूनच मकबरा कमकुवत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये जागतिक वारसा सप्ताह सुरू असतानाच बीबी का मकबऱ्याचा कोपरा ढासळल्याची घटना घडली होती. जो कोपरा ढासळला, तेथे झाड वाढलेले होते. ढासळलेला भाग पुन्हा पूर्ववत बांधण्यात आला. परंतु अशाप्रकारे मकबऱ्याचा भाग कोसळण्याचा धोका अद्यापही कायम आहे. काही गेल्या दोन महिन्यांत पडलेल्या पावसाने मकबऱ्यासह मिनारवर झाडी वाढली आहेत. त्यामुळे मकबऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
नियमित पाहणी, लिक्विडने झाडी नष्ट करावी
ड्रोनच्या माध्यमातून पुरातत्व सर्वेक्षणाने मकबऱ्याची नियमितपणे पाहणी करावी. झाडीझुडपी वाढलेली दिसल्यास लिक्विडच्या मदतीने ती वेळीच नष्ट करून हा वारसा जपावा, अशी अपेक्षा इतिहास तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
पुरातत्व सर्वेक्षणाचे अधिकारी म्हणाले...
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे अधीक्षक (अधीक्षण पुरातत्वविद) डाॅ. शिव कुमार भगत म्हणाले, बीबीका मकबऱ्याची पाहणी केली जाईल. पावसामुळे ठिकठिकाणी ओलसरपणा असतो. त्यामुळे कामगारांना काम करण्यास अडचण येते. ओलसरपणा कमी होताच झाडी हटविली जातील.