‘एम.फार्मसी’ प्रवेशात दिव्यांग उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:56 AM2017-08-18T00:56:10+5:302017-08-18T00:56:10+5:30
औषधनिर्माणशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत सुरुवातीला दिव्यांगांची स्वतंत्र गुणवत्ता यादी लावण्यात आली. मात्र प्रत्यक्षात तीन फेºयांमध्ये एकाही दिव्यांगाला आरक्षणानुसार प्रवेश मिळाला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य सरकारच्या सीईटी सेलमार्फत औषधनिर्माणशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत सुरुवातीला दिव्यांगांची स्वतंत्र गुणवत्ता यादी लावण्यात आली. मात्र प्रत्यक्षात तीन फेºयांमध्ये एकाही दिव्यांगाला आरक्षणानुसार प्रवेश मिळाला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याविषयी एका विद्यार्थ्याने तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयात तक्रार नोंदविली आहे.
औषधनिर्माणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची नुकतीच तिसरी प्रवेश फेरी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीत अभिजित भीमराव गायकवाड या दिव्यांग विद्यार्थ्याचा खुल्या प्रवेश गटातून खाजगी महाविद्यालयात नंबर लागला आहे. त्याचा खुल्या गुणवत्ता यादी २४३५ क्रमांक होता. मात्र दिव्यांगांच्या गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक होता. दिव्यांगांना असलेल्या आरक्षणानुसार त्याला शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे अपेक्षित होते. मात्र दिव्यांगाचे आरक्षण उपलब्ध जागेमध्ये बसत नाही. यामुळे दिव्यांगांनाही खुल्या गटातून प्रवेश देण्यात येत आहेत. तक्रारदार अभिजित गायकवाड म्हणाला, तिसºया फेरीत खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. या महाविद्यालयाचे शुल्क भरू शकत नाही. दिव्यांगांना आरक्षण दिले तर शासकीय नंबर लागला आहे. आता शुल्काअभावी प्रवेश घेऊ शकत नाही. हा अन्यायच असल्याचे त्याने सांगितले. आतापर्यंत जाहीर झालेल्या तिन्ही फेºयांमध्ये एकाही गटातून दिव्यांगांना संधी देण्यात आलेली नाही. दिव्यांगांना एकूण जागेच्या ३ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र या तरतुदीची औषधनिर्माणच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. याविषयी सीईटी सेलचे सहसंचालक दयानंद मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.