अवैध गौण खणिज वाहतुकीकडे दुर्लक्ष करणे भोवले; तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 06:16 PM2023-11-03T18:16:43+5:302023-11-03T18:17:08+5:30
उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांचा दणका.
पैठण: गौण खणिज अवैध वाहतूक कारवाई बाबत निष्काळजीपणा करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशासकीय कारवाई का प्रस्तावीत करू नये ? या बाबत चोवीस तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने गौण खणिज तस्करांना जाणूनबुजून अभय देणाऱ्या पैठण तहसीलच्या कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.
उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी दि २ रोजी ढोरकीन परिसरात अवैध वाळू करीत असलेल्या ट्रक्टरवर कारवाई केली. त्यानंतर ढोरकीनचे मंडळ अधिकारी सीमा भोसले, तलाठी दिलीप बावस्कर व कोतवाल रंजित नवले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. अवैध उत्खनन व वाहतूकीबाबत मंडळ अधिकारी व तलाठी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ढोरकीन परिसरात मोठ्या प्रमाणात गौणखणिजाची चोरी होत असल्याचे नोटिसमध्ये म्हटले आहे. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न करता निष्काळजीपणाची भूमिका घेतल्याने महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) १९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये? या बाबत खुलासा करावा असे उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी नमूद केले आहे.
१ एप्रिल पासून केलेल्या कारवाईचा अहलाल सादर करा
दरम्यान, तालुक्यात होत असलेल्या गौण खणिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीकडे महसूलच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. उपविभाग अधिकारी सोहम वायाळ यांनी तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांना १ एप्रिलपासून आजपर्यंत केलेल्या गौण खणिज प्रतिबंधात्मक कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरमहा दिलेले कारवाईचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेले नसल्याने संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यात खळबळ उडाली आहे.
तस्कर गायब
उपविभागीय अधिकारी वायाळ यांनी अवैध गौण खणिजाबाबत घेतलेल्या कडक भूमिकेमुळे शुक्रवारी बहुतेक तलाठी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र, प्रशासनाच्या कारवाईचे संकेत मिळाल्याने शुक्रवारी वाळू व मुरूम तस्कर गायब झाल्याची चर्चा होत होती.