मोंढ्यातील निजामकालीन पोलीस चौकीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:03 AM2021-05-10T04:03:57+5:302021-05-10T04:03:57+5:30
औरंगाबाद : मागील वर्षभरात कोरोना काळात जुन्या मोंढ्यात ५ दुकाने फोडली गेली आहेत. यामुळे मोंढ्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला ...
औरंगाबाद : मागील वर्षभरात कोरोना काळात जुन्या मोंढ्यात ५ दुकाने फोडली गेली आहेत. यामुळे मोंढ्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे निजामकालीन पोलीस चौकी आहे. पण, देखभाल- दुरुस्तीअभावी भिंती पडल्या आहेत. चौकी बांधून देण्यासाठी येथील व्यापारी पुढे सरसावले आहेत. पण, इमारत बांधल्यानंतर तिथे २४ तास पोलिसांची ड्युटी असावी, अशी अट व्यापाऱ्यांनी घातली आहे.
शहराच्या मध्यवस्तीत असणारा नवा व जुना मोंढा परिसर तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. क्रांतीचौक पोलीस स्टेशन, जिन्सी पोलीस स्टेशन व सिटीचौक पोलीस स्टेशन असे असतानाही दर दोन ते तीन महिन्यांनी मोंढ्यात दुकानफोडीच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे या मोंढ्याजवळच पोलीस चौकी आहे. क्रांतीचौक पोलीस स्टेशनअंतर्गत ही चौकी येते. मात्र, या पोलीस चौकीच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात या चौकीची पाठीमागील रूमचे छत खाली कोसळले. यामुळे येथे जीवमुठीत ठेवून वावरावे लागते. येथे कधी तरी पोलीस दिसतात.
यासंदर्भात ज्येष्ठ व्यापारी सतीश सिकची यांनी सांगितले की, १९३४ मध्ये शहागंजमधून मोंढा सध्याच्या जागी स्थलांतर झाला. त्यावेळी येथे मोंढ्याच्या संरक्षणासाठी निजामने पोलीस चौकी बांधली होती. चुकीसाठी देण्यात आलेली जागा ही औरंगाबाद मर्चंट असोसिएशनची आहे. मात्र, देखभाल व पोलीस आयुक्तालयाचे दुर्लक्ष झाल्याने ही निजामकालीन पोलीस चौकी खंडहर बनली आहे. स्थानिक आमदार विकास निधीतून ४५ लाख रुपये खर्चून येथे पोलीस चौकीची ३ मजली इमारत उभारण्याचा विचार सुरू आहे. व्यापारी संघटनेने रंगकाम व लाईट फिटिंग करावे, असेही ठरले आहे. आता चेंडू पोलीस आयुक्तालयात आहे.
चौकट
व्यापारी घेणार पुढाकार
आम्ही मागील वर्षीच क्रांतिचौक पोलीस स्टेशनमध्ये प्रस्ताव दिला होता. मोंढ्यात पोलीस चौकी बांधण्यासाठी व्यापारी संघटना सहकार्य करेल. पण, आमच्या प्रस्तावाचा अजून विचार झाला नाही.
नीलेश सेठी
अध्यक्ष, जनरल किराणा मर्चंट असोसिएशन
चौकट
चौकीत २४ तास पोलीस असावेत
मोंढ्यात पोलीस चौकी उभारण्यासाठी व्यापारी संघटना सहकार्य करण्यास तयार आहे. पण, येथील चौकीत २४ तास पोलीस असावे. तरच त्या चुकीचा फायदा होईल.
संजय कांकरिया
माजी अध्यक्ष, जनरल किराणा मर्चंट असोसिएशन