आयआयटीने १०८ पैकी फक्त ३ रस्त्यांच्या कामांना दिली मुभा; गुणवत्ता पाहुण पुढील कामांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:36 PM2022-06-01T17:36:24+5:302022-06-01T17:36:50+5:30
३१७ कोटी रुपये खर्च करून १०८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे केली जाणार आहेत.
औरंगाबाद :आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी सोमवारी १०८ पैकी फक्त तीन रस्त्यांच्या कामांना मुभा दिली. मंगळवारी ही कामे सुरू होतील. कामाची गुणवत्ता तपासल्यानंतर उर्वरित कामांना हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि स्मार्ट सिटी प्रशासनाला सत्व परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
३१७ कोटी रुपये खर्च करून १०८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे केली जाणार आहेत. या कामांच्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसाठी ‘स्मार्ट सिटी’ ने मुंबई येथील आयआयटीशी करार केला आहे. आयआयटीचे प्रा.डॉ. धर्मवीर सिंह आपल्या सहकाऱ्यांसह शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ‘स्मार्ट सिटी’अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, स्नेहा बक्षी, अर्पिता शरद, पीएमसीचे समीर जोशी उपस्थित होते.
प्रा. डॉ. धर्मवीर सिंह म्हणाले, रस्त्यांच्या पाहणीच्यावेळी संबंधित कंत्राटदार आणि पीएमसीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. त्यांना रस्त्यांच्या बांधणीबद्दल सूचना करण्यात आल्या. शहरात आतापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी आम्ही केली. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये आणि पद्धतीत बदल करावा लागेल. ‘प्रत्येक पॅकेजमधील एक अशा तीन रस्त्यांची कामे उद्यापासूनच सुरू केली जातील.
या तीन रस्त्यांची निवड
औरंगपुरा ते नेहरू भवन, शारदा मंदिर आणि सरस्वती भुवन, भाग्यनगरचा रस्ता
मनपा अधिकारी कामांपासून दूर
आयआयटीचे प्रा.डॉ. धर्मवीर सिंह यांच्यासोबत रस्त्यांची पाहणी करताना ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अभियंत्यांना बोलावलेच नाही. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर महापालिकेकडेच रस्ते हस्तांतरित करावे लागणार आहेत, त्यामुळे पाहणीच्या वेळी पालिकेचे अभियंते असणे आवश्यक होते, असे मानले जात आहे.