आयआयटी तपासणार औरंगाबादमधील ३१७ कोटींच्या रस्ते कामांची गुणवत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:01 PM2022-03-31T20:01:47+5:302022-03-31T20:02:05+5:30
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून १०८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
औरंगाबाद : स्मार्ट सिटीमार्फत लवकरच १०८ रस्त्यांची कामे एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहेत. या कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवण्यासाठी आयआयटी (पवई) या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम गुणवत्तापूर्ण होईल, असा विश्वास स्मार्ट सिटी प्रशासनाने व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे रस्त्याची कामे स्मार्ट सिटी प्रथमच करीत आहे.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून १०८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यातील बहुतेक रस्त्यांची कामे काँक्रीटीकरण पद्धतीची राहणार आहेत. ही कामे शासनाच्या निधीतून व्हावीत, या उद्देशाने महापालिकेने ३१७ कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करून शासनाला पाठविला होता. मात्र, शासनाने मंजुरी दिली नाही. शेवटी ऐन वेळी रस्त्यांची कामे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला. मंडळाने मंजुरी दिल्यावर निविदा काढण्यात आली. रस्त्यांसाठी तीन स्वतंत्र निविदा काढल्या आहेत. तीन कंत्राटदार एकाच वेळी कामे सुरू करणार आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला फक्त नऊ महिन्यांची वेळ देण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ११ निविदा प्राप्त झाल्या.
शिखर संस्थेला प्राधान्य
रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी ‘त्रयस्थ तपासणी’ (थर्ड पार्टी इन्स्पेक्शन) कोणती एजन्सी करणार, याबद्दल स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले की, थर्ड पार्टीसाठी आयआयटी (पवई) या शिखर संस्थेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याच संस्थेने ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करावे, असा आग्रह ‘स्मार्ट सिटी’ ने धरला आहे. त्यांनी अद्याप होकार दिलेला नाही.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातूनदेखील ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करून घेण्याची ‘स्मार्ट सिटी’ची तयारी आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून अन्य कामांचे ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ केले जात आहे. त्यामुळे ही तपासणी आयआयटीनेच करावी, अशी ‘स्मार्ट सिटी’ची भूमिका आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
निविदा रक्कम, प्राप्त निविदा
पॅकेज - रक्कम - दाखल निविदा
१ - ८४ कोटी - ०३
२ - ८६ कोटी - ०४
३ - ९० कोटी - ०४