वैजापुरात आजपासून इज्तेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:02 AM2018-12-29T00:02:15+5:302018-12-29T00:02:40+5:30
तयारी पूर्ण : हजारो भाविक दाखल; सुसज्ज सोयी-सुविधा
वैजापूर : शहरातील मिल्लतनगर परिसरात शनिवारपासून दोन दिवसीय तालुकास्तरीय इज्तेमाला सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील लाखो भाविक या सोहळ्याला हजेरी लावणार असून, यासाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
नऊ एकरवर जणू काही एक नवीन शहरच वसविण्यात आल्याची प्रचिती या इज्तेमानिमित्त येत असून, संयोजन समितीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इज्तेमाच्या वैभवात भरच टाकली आहे. समितीसह येथे अनेक दिवसांपासून श्रमदान करणाऱ्या हजारो नागरिकांचे काम थक्क करणारे आहे.
वैजापूर शहराला तब्लिगी जमातच्या तालुकास्तरीय इज्तेमाचे संयोजनपद पहिल्यांदाच मिळाले आहे. २९ डिसेंबरपासून सुरू होणाºया या सोहळ्याच्या निमित्ताने शुक्रवारीच हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातील भाविक शहरात दाखल झाले. शुक्रवारी दुपारी विशेष नमाज अदा करण्यासाठी येथे गर्दी झाली होती.
इज्तेमासाठी मागील एक महिन्यांपासून हजारो मुस्लिम बांधव याठिकाणी विविध सुविधा पुरविण्यासाठी श्रमदान करीत आहेत. इज्तेमासाठी शेकडो हिंदू-मुस्लिम व इतर समाजबांधवांनी आपल्या जमिनी स्वखुशीने देऊन राष्ट्रीय एकात्मा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. इज्तेमाच्या ठिकाणी मुस्लिम भाविकांसाठी विविध सुविधांची सोय करण्यात आली. विशेष करून अगदी अल्पदरामध्ये जेवण उपलब्ध आहे.
इज्तेमास्थळी पुण्याचे मौलाना मुबीन, नांदेडचे मौलाना साद अब्दुल्ला, औरंगाबादचे मुफ्ती नईम आणि मौलाना शमशुद्दीन या धर्मगुरूंचे मार्गदर्शन होणार आहे. इज्तेमा यशस्वी करण्यासाठी शेकडो स्वयंसेवक मेहनत घेत आहेत. तसेच ठिकठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली. वाहनांच्या पार्कींगसाठी वेगळी सोय करण्यात आली तर स्टेशन रस्ता, शिवराई रोड, लाडगाव चौफुली, हायवे चौफुली परिसरासह इतर ठिकाणच्या चौकात स्वयंसेवक नियुक्त करण्यात आलेले आहेत. रविवारी सायंकाळी दुवाने इज्तेमाची सांगता होणार आहे.
नऊ एकरमध्ये भव्य शामियाना
इज्तेमासाठी नऊ एकरात जवळपास साडेतीनशे बाय दोनशे ब्रासचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. या शामियान्यात एकाच वेळी दीड ते दोन लाख भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. खुर्च्या ध्वनीक्षेपक, पंखे, लाईट, जनरेटर, पिण्याच्या पाण्याचे एक हजारापेक्षा अधिक नळ, ४०० वजूखाने, १०० स्वच्छतागृहे, १० स्नानगृहांची उभारणी, पाण्यासाठी २४ हजार लिटरचे ३ टँक उभारण्यात आले आहेत. शिवाय, टँकरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. इज्तेमा परिसरात पाच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन ठिकाणी भोजनगृह उभारण्यात आले आहेत. चहा, नाश्त्यासाठी हॉटेल्सचे स्टॉल राहणार आहेत. प्राथमिक उपचार केंद्राची व्यवस्था, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोयही स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.
अधिकाºयांनी केली पाहणी
शनिवारपासून सुरु होणा-या इज्तेमा स्थळाची शुक्रवारी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार विनोद गुंडमवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल डाके, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर,
वैद्यकीय अधीक्षक पी. एम. कुलकर्णी, संजय घुगे यांनी पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.