श्वास चित्रपटाची कथा प्रत्यक्षात; ब्रेनट्यूमरमुळे अंधत्व आलेल्या नातीसाठी आजोबाची धडपड
By संतोष हिरेमठ | Published: August 25, 2022 07:58 PM2022-08-25T19:58:41+5:302022-08-25T19:59:39+5:30
‘आजोबा, मला फक्त अभ्यास करता येत नाही, लिहिता येत नाही’
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ‘श्वास’ चित्रपटात एक आजोबा आपल्या कॅन्सरग्रस्त नातवाला बरे करण्यासाठी जिवाची बाजी लावतात. अगदी या चित्रपटातील आजोबांप्रमाणे औरंगाबादेतील एक आजोबा ब्रेनट्यूमरमुळे अंधत्व आलेल्या आपल्या ८ वर्षाची नात ‘आराध्या’साठी धडपडत आहेत. अशा परिस्थितीतही ‘आजोबा, मला सगळं करता येते, फक्त अभ्यास करता येत नाही, लिहिता येत नाही...’ अशी खंत ही चिमुकली व्यक्त करते.
जागतिक नेत्रदान पंधरवडा प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी आमखास मैदानासमोरील जिल्हा नेत्र विभागात या आजोबांनी नेत्रदानाचा अर्ज भरून दिला. प्रल्हाद शेलार (रा. जांभळा, ता. गंगापूर) असे या आजोबांचे नाव आहे. त्यांच्यासोबत त्यांची नात आराध्या होती. साडेतीन वर्षांची असताना आराध्याला ब्रेन ट्यूमर झाला. ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया होईपर्यंत आराध्याला सर्व काही दिसत होते. मात्र, ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ दिवसांनंतर तिची दृष्टी गेली. सगळ्या कुटुंबावर जणू दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर तिच्या दृष्टीसाठी अनेक डाॅक्टरांना दाखविले, आराध्या इयत्ता दुसरीत आहे. परंतु आता तिला अंध मुलांच्या शाळेत टाकायचे आहे. त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र लागणार असल्याने बुधवारी जिल्हा नेत्र रुग्णालयात आले होते.
दृष्टी परत मिळावी...
जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डाॅ. संतोष काळे, नेत्रदान समुपदेशक दत्ता बढे यांच्या उपस्थितीत प्रल्हाद शेलार यांनी नेत्रदानाचा अर्ज भरून दिला. आपल्या नेत्रदानामुळे कोणाला तरी दृष्टी मिळाली, तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही, असे प्रल्हाद शेलार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
‘मला डाॅक्टर व्हायचे....’
दृष्टी नसतानाही आपल्याला दिसत नाही, याची जाणीवच आराध्या कोणाला होऊ देत नाही. कविता, पाढे तिला तोंडपाठ आहे. दिसत नसले तरी मी सगळं करू शकते, मला जर दिसू लागले तर मला लिहायचे आहे, डाॅक्टर व्हायचे आहे, असे आराध्या म्हणाली.