जिल्ह्यातील २७ महाविद्यालयांचे बिंग फुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 04:47 PM2020-09-30T16:47:25+5:302020-09-30T16:47:47+5:30
जिल्ह्यातील काही ज्युनिअर कॉलेजमध्ये इतर जिल्ह्यांसह परराज्यातील विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येत असून त्यांच्याकडून भली मोठी रक्कम उकळण्यात येत असल्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत.
रऊफ शेख
फुलंब्री : किनगावच्या ज्युनिअर कॉलेजच्या अनागोंदी कारभाराची माहिती समोर येताच अनेक संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यातील काही ज्युनिअर कॉलेजमध्ये इतर जिल्ह्यांसह परराज्यातील विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येत असून त्यांच्याकडून भली मोठी रक्कम उकळण्यात येत असल्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत.
यात जिल्ह्यातील २७ महाविद्यालये असे प्रकार करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यामुळे त्यांचे बिंग फुटणार असल्याने संस्थाचालक हैराण झाले आहेत. मान्यता एका ठिकाणची, तर कॉलेज चालते दुसरीकडे असे प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असून याकडे शिक्षण विभागासह विद्यापीठ प्रशासनसुद्धा डोळेझाक करत आहे. त्यामुळे संस्थाचालकांचे चांगलेच फावते आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात तीन ते चार वर्षांपुर्वी अशाच काही महाविद्यालयांना मान्यता मिळाली असून ११ वी व १२ वीची मान्यता असल्याने संबंधित महाविद्यालयांतून दोन बॅचेस उत्तीर्ण होऊन निघाल्या आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कागदोपत्री उपस्थित दाखविण्याचे प्रकार संस्थाचालकांकडून करण्यात येत आहेत.
वर्षभर अनुपस्थित राहिले तरी पास होण्याची हमी विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विद्यार्थी अशा महाविद्यालयांना प्रवेश घेत असून शिक्षणसंस्था त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत असल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहेत.