लाखणी गटातून दोन हजारांपेक्षा अधिक ब्रास वाळूचा अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:05 AM2021-04-18T04:05:11+5:302021-04-18T04:05:11+5:30
वैजापूर : कन्नड तालुक्यातील देवळी शिवारातील शिवना नदीतून प्रशासनाने ठरवून दिलेल्या गटाऐवजी संबंधित ठेकेदाराने लाखणीच्या गटातून (ता. वैजापूर) दोन ...
वैजापूर : कन्नड तालुक्यातील देवळी शिवारातील शिवना नदीतून प्रशासनाने ठरवून दिलेल्या गटाऐवजी संबंधित ठेकेदाराने लाखणीच्या गटातून (ता. वैजापूर) दोन हजारांहून अधिक ब्रास वाळूचा अवैधरीत्या बेसुमार उपसा केल्याचे समोर आले आहे. कन्नड व वैजापूर तालुका भूमी निरीक्षक कार्यालयाने संयुक्तपणे नदीपात्राची मोजणी करून हद्द निश्चित केल्यानंतर या वाळूचोरीचे बिंग फुटले आहे.
गेल्या आठवड्यात वाळूचा अवैध उपसा रोखल्याने ठेकेदारासह देवळी येथील वाळू तस्करांनी लाखणीतील ग्रामस्थांना बेदम मारहाण केली होती. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर नदीपात्राची हद्द निश्चित करण्याची भूमिका वैजापूर महसूल प्रशासनाने घेतली. नदीच्या पलीकडे कन्नड तालुक्यातील देवळी गाव आहे. जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात देवळी शिवारातील १, ९, २३ व २६ या गटातील एकूण ६ हजार ८२ ब्रासचा लिलाव केला होता. संबंधित ठेकेदार व स्थानिक वाळू तस्करांनी लिलावाच्या नावाखाली लाखणी शिवारातील संरक्षित असलेल्या हद्दीतून वाळूचा उपसा अवैधरीत्या सुरू केला. ही बाब लाखणीच्या ग्रामस्थांना लक्षात आल्याने ५ एप्रिल रोजी त्यांनी हद्दीतून होणाऱ्या वाळू उपशाला विरोध केला होता. त्यामुळे देवळीचे स्थानिक वाळू तस्कर व ठेकेदारात धुमश्चक्री उडाली होती. वाळू भरण्यासाठी नदीपात्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी कन्नडचे उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. दोन्ही तालुक्यांच्या भूमी निरीक्षक कार्यालयामार्फत हद्दीची मोजणी करून मार्किंग करण्याचा निर्णय महसूल अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानुसार ७ व ९ एप्रिल रोजी शिवना नदीपात्राची मोजणी करण्यात आली. तालुका भूमी निरीक्षक कार्यालयाचे भूमापक बाबासाहेब साळुंके यांच्यासह गारजचे मंडळाधिकारी गायकवाड व तलाठी विनोद क्षीरसागर यांनी वैजापूर तालुक्यातील नदीपात्राची मोजणी करून हद्दनिश्चिती केली. त्यानंतर लाखणीच्या हद्दीतील नदीपात्रातून संबंधित ठेकेदाराने अवैधरीत्या वाळू उपसा केल्यामुळे खड्डे झाल्याचे दिसून आले. या खड्ड्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सीमा कोलते यांनी मोजमाप केले. त्यातून सुमारे २ हजार ३९ ब्रास वाळूचा उपसा झाल्याचा अहवाल तहसील कार्यालयास दिला आहे.