२० लाख रुपयांचा अवैध गुटखा गुन्हे शाखेने पकडला, सातारा परिसरात छापा
By राम शिनगारे | Published: November 16, 2022 09:48 PM2022-11-16T21:48:34+5:302022-11-16T21:48:39+5:30
तीन आरोपींकडून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
औरंगाबाद : बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याचा साठा चारचाकी गाडीतून घरात उतरवून घेत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून तिघांना पकडले. ही कारवाई मंगळवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास महुनगर (सातारा परिसर) येथे करण्यात आली. आरोपींकडून १९ लाख ८६ हजारांच्या गुटख्यासह एक चारचाकी वाहन आणि मोबाइल असा एकूण २४ लाख ९६ हजार ६६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
इरफान रशीद खान (रा. सिल्कमिल कॉलनी, ह.मु. महुनगर, सातारा परिसर), सय्यद सोहेल सय्यद महेमुद (रा. कैसर कॉलनी) आणि मोहम्मद वसीम मोहम्मद हुसैन (रा. आमराई, बीड बायपास) अशी आरोपींची नावे आहेत. सातारा ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शाहिद साजीदुज्जूमॉ यांनी दिले.
अवैध मद्यविरोधी सेलचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड यांना अवैध गुटख्याचा साठा उतरविला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. चारचाकी वाहनातून (एमएच २० - ईजी ४७१७) गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याचा साठा एका घरात उतरविताना छापा मारला. त्या वाहनातून ७ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा गुटखा जप्त केला. त्यानंतर पथकाने घराची झडती घेतली असता घरात सुमारे १२ लाख ४४ हजार १६० रुपयांचा गुटखा आढळून आला. गुन्हे शाखेचे पोलीस नाईक मनोज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सपोनि ज्ञानेश्वर अवघड अधिक तपास करीत आहेत.