औरंगाबादमध्ये चालतोय गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 07:24 PM2019-01-30T19:24:32+5:302019-01-30T19:26:40+5:30

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने अतिरक्तस्राव आणि अर्धवट गर्भपात होण्याचे प्रकार होत आहेत.

Illegal 'industry' of abortive pill injuries in Aurangabad | औरंगाबादमध्ये चालतोय गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’

औरंगाबादमध्ये चालतोय गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य विभागाचा कानाडोळाअर्धवट गर्भपात झालेले घाटीत आठवड्याला दोन रुग्ण

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध विक्रीचा ‘उद्योग’ सुरू आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने अतिरक्तस्राव आणि अर्धवट गर्भपात होण्याचे प्रकार होत आहेत. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात आठवड्याला दोन रुग्ण दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

गर्भपाताच्या गोळ्या ठराविक आठवड्यापर्यंत घेण्याचा नियम असताना त्यानंतरही वापरण्याचा प्रकार होत आहे. शिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेताना पहिली गोळी घेतल्यावर ठराविक तासांनी दुसरी गोळी घ्यायची असते; परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे गोळ्या घेणाºयांना त्याविषयी गोळीबद्दल माहितीच दिली जात नाही. त्यामुळे या गोळ्या घेणाºया महिलांमध्ये अपूर्ण गर्भपात  होतो. त्यातून अधिक प्रमाणात रक्तस्राव आणि जंतुसंसर्ग होण्याचा प्रकार होतो. त्यामुळे महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. 

या प्रकारातून महिलांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. घाटी रुग्णालयात अधिक रक्तस्राव झाल्याने गंभीर अवस्थेत आठवड्याला दाखल होणाºया महिला आता नित्याची बाब झाली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 
ग्रामीण भागातील नागरिकांबरोबर शहरी सुशिक्षित लोकांकडूनही या गोळ्यांची खरेदी केली जात आहे.  आरोग्य विभागाचा या प्रकारांकडे कानाडोळा होत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात असा प्रकार नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.

दीड ते दोन हजारांत विक्री
चारशे ते पाचशे रुपये किंमत असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या अक्षरश: दीड ते दोन हजारांपर्यंत सर्रास होत असल्याचे समजते. ग्रामीण भागासह शहरी भागात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या उपलब्ध करून देणारे सक्रिय आहेत. परंतु त्यांच्यापर्यंत आरोग्य विभाग पोहोचत नसल्याने हा ‘धंदा’ जोरात सुरू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

पुढे गर्भधारणेची शक्यता कमी 
घाटीत आठवड्याला एक ते दोन रुग्ण येतात. ज्यांनी बाहेरून गर्भपाताच्या गोळ्या घेतलेल्या असतात. अनेक जण पात्रता नसलेल्या डॉक्टरांकडून गोळ्या घेतात. त्यातून रक्तस्राव, अर्धवट गर्भपाताचा प्रकार होतो. नेमक्याकोणाकडून गोळ्या घेतल्या हे रुग्ण सांगत नाहीत. हा प्रकार रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो. जंतुसंसर्ग होऊ शकतो. शिवाय पुढे गर्भधारणेची शक्यता कमी होते. कायदेशीररीत्या गर्भपात होतो, याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.
-डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, प्रसूतीशास्त्र विभाग, घाटी

४० टक्के महिलांत गुंतागुंत 
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याने ४० टक्के महिलांत गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते. प्रामुख्याने ग्रामीण भागांत गर्भपातासाठी सर्रास गोळ्या लिहून देण्याचा प्रकार होत आहे. यासंदर्भात मी अमेरिकेतील परिषदेत केस स्टडी सादर केली आहे. सॅम्पल म्हणून दिलेल्या गोळ्यांचीही विक्री केली जाते.
- डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, सचिव, महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशन

जिवावर बेतू शकते
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेणे जिवावर बेतू शकते. गोळ्या घेतल्यानंतर अधिक रक्तस्राव झाल्याने महिला रुग्णालयात येतात. अर्धवट गर्भपात झालेल्या महिला रुग्णालयात येतात. त्यांना काळजीपूर्वक विचारणा केल्यानंतर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याचे सांगतात. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रेत्यांनी गर्भपाताच्या गोळ्या देता कामा नये.
- डॉ. वर्षा देशमुख, अध्यक्षा, स्त्रीरोग संघटना

Web Title: Illegal 'industry' of abortive pill injuries in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.