अवैध ‘उद्योग’! गुपचूप खातात गर्भपाताच्या गोळ्या; रोज २ महिला रुग्णालयात येतात अत्यवस्थेत

By संतोष हिरेमठ | Published: October 22, 2022 02:06 PM2022-10-22T14:06:48+5:302022-10-22T14:07:37+5:30

डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेणे जिवावर बेतू शकते.

Illegal 'industry'! secretly taking abortion pills; Every day 2 women come to the hospital in emergency condition | अवैध ‘उद्योग’! गुपचूप खातात गर्भपाताच्या गोळ्या; रोज २ महिला रुग्णालयात येतात अत्यवस्थेत

अवैध ‘उद्योग’! गुपचूप खातात गर्भपाताच्या गोळ्या; रोज २ महिला रुग्णालयात येतात अत्यवस्थेत

googlenewsNext

औरंगाबाद : अवैधरित्या खरेदी करून गर्भपाताच्या गोळ्या खाण्याचा प्रकार सुरू आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेतल्याने अति रक्तस्राव आणि अर्धवट गर्भपात झालेल्या दररोज सरासरी दोन महिला घाटीत येत असल्याचे निरीक्षण डाॅक्टरांनी नोंदविले आहे. कोणाच्या सल्ल्याने या गोळ्या घेतल्या, याचे उत्तरच बहुतांश महिला डाॅक्टरांना देत नाहीत. गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध विक्रीचा ‘उद्योग’ जिल्ह्यात जोरात सुरू असल्याची परिस्थिती आहे.

गर्भपाताच्या गोळ्या डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक आहे. डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या मिळताही कामा नयेत. या गोळ्या घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि देखरेखीत होणे आवश्यक आहे; परंतु, बेकायदेशीरपणे गोळ्या घेऊन गर्भपाताचा प्रयत्न केला जात आहे. घाटीत दररोज किमान एक ते दोन रुग्ण येतात, ज्यांनी बाहेरून अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्या घेतलेल्या असतात. अवैधरित्या अथवा पात्रता नसलेल्या डाॅक्टरांकडून या गोळ्या घेतल्या जातात. त्यातून रक्तस्राव, अर्धवट गर्भपाताचा प्रकार झाल्यानंतर महिला घाटी रुग्णालय गाठत असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे.

रुग्णांची वेगळी नोंद
डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेणे जिवावर बेतू शकते. गोळ्या घेतल्यानंतर अति रक्तस्राव झाल्याने महिला रुग्णालयात येतात. त्याबरोबर अर्धवट गर्भपात झालेल्या महिलाही रुग्णालयात येतात. महिलांना अधिक काळजीपूर्वक विचारल्यानंतर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याचे त्या सांगतात; परंतु, गोळ्या कोणी दिल्या, हे सांगितले जात नाही. त्यांच्याकडे डाॅक्टरांची कोणतीही चिठ्ठी नसते. अशा रुग्णांची वेगळी नोंद ठेवली जात आहे, असे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले.

अवैधरित्या गोळ्या घेऊ नये
कायदेशीररित्या गर्भपात करता येतो. त्यामुळे शासकीय केंद्रात जाऊन गर्भपात केला पाहिजे. अवैधरित्या गोळ्या घेऊ नये. त्यातून अनेक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येते. गर्भपातासाठी अवैधरित्या गोळ्या घेतलेले घाटीत दररोज किमान दोन रुग्ण येत असल्याची परिस्थिती आहे.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी

Web Title: Illegal 'industry'! secretly taking abortion pills; Every day 2 women come to the hospital in emergency condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.