अवैध दारू विक्रेते आणि ग्राहक पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 08:35 PM2019-01-10T20:35:54+5:302019-01-10T20:36:18+5:30
काही हॉटेलचालक ग्राहकांच्या मागणीप्रमाणे चोरट्या मार्गाने दारू विक्री करीत असल्याचे समोर आले.
औरंगाबाद : हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये बेकायदेशीरीत्या दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करणारे हॉटेलचालक आणि ग्राहक सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. अवैध दारू विक्रेत्यांसोबत बार नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदविण्यास सुरुवात केली. दोन दिवसात विविध ठिकाणी छापे मारून ६० हून अधिक मद्यपींवर कारवाई केली. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांसोबतच मद्यपींमध्ये खळबळ उडाली.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०४ बीअर बार रेस्टॉरंट आणि सरकारमान्य देशी दारूची ३७ तर २८ वाईन शॉप आहेत. सरकारने बीअर बारच्या शुल्कात मोठी वाढ केल्यापासून बारमध्ये जाऊन मद्य पिणे अनेकांना परवडत नाही. मात्र, दारूचे व्यसन असलेली मंडळी मात्र सरकारमान्य दारू दुकानातून दारूची बाटली विकत घेऊन अंडा आम्लेट ची गाडी अथवा जेथे बार नाही, अशा हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन मध्य पितात आणि तेथेच जेवण करतात.
परमिटरूम बार नसलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करणे गुन्हा आहे. असे असताना शहरातील बऱ्याच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट गुपचूप अथवा पोलिसांसोबत अर्थपूर्ण संबंध ठेवून बिनधास्तपणे ग्राहकांना दारू पिण्यासाठी हॉटेलमध्ये जागा उपलब्ध करून देतात. अशा अनधिकृत बीअरबारमुळे मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय रात्री ११ वाजता हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचे पोलिसांचे आदेश असताना रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल्स उघडे असतात.
अशा अनधिकृत बारविरोधात पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशाने कारवाई सुरू झाली. दोन दिवसांमध्ये पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, वडगाव कोल्हाटी, एस. टी. वर्कशॉप, चिकलठाणा परिसरातील विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर गुन्हे शाखा आणि संबंधित ठाण्याच्या पोलिसांनी छापे टाक ले. या कारवाईत तेथे दारू पीत बसलेल्या ग्राहकांसह हॉटेलचालकांविरोधात गुन्हे नोंदविले. पोलिसांकडून सलग कारवाई होत असल्याने मद्यपी ग्राहकांसोबत हॉटेलचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. यातील काही हॉटेलचालक ग्राहकांच्या मागणीप्रमाणे चोरट्या मार्गाने दारू विक्री करीत असल्याचे समोर आले.
शहरात २०४ बीअर बार
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार औरंगाबाद शहरात २०४ बीअर बार आणि परमिटरूम असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आहेत. सरकारमान्य देशी दारूची ३७ दुकाने आणि विदेशी मद्य, वाईन विक्री करणारी २८ दुकाने आहेत.