बेकायदाच पण जोरात...
By Admin | Published: June 3, 2016 11:36 PM2016-06-03T23:36:20+5:302016-06-03T23:45:01+5:30
औरंगाबाद : राज्यात गुटखा उत्पादन आणि विक्रीसाठी बंदी असली तरी औरंगाबाद शहरात त्याला बंदी नाही.
औरंगाबाद : राज्यात गुटखा उत्पादन आणि विक्रीसाठी बंदी असली तरी औरंगाबाद शहरात त्याला बंदी नाही. म्हणजे कागदोपत्री बंदी असली तरी बसस्थानक, औरंगपुरा, गारखेड्यासह शहरातील अनेक भागांत गुटख्यांची सर्रास विक्री चालू असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या स्ंिटग आॅपरेशनमध्ये समोर आले.
गुटखा विक्रीला बंदी असली तरी अन्न व औषधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा कारवाईची कोणतीही भीती न राहिल्यामुळे ही विक्री चालू असल्याचे समोर आले. गुटख्याच्या विक्रीबाबत तक्रारी आल्यानंतर याची शहानिशा करण्यासाठी ‘लोकमत’ने यासंबंधीची छुप्या पद्धतीने पाहणी केली असता गुटखा विक्री चालू असल्याचे स्पष्ट झाले.
बसस्थानक परिसरात अनेक पानटपऱ्यांवर गुटख्यांची उघडपणे विक्री होत असल्याचे दिसले. लोकमत प्रतिनिधीने बसस्थानकाच्या समोरील एका पानटपरीवर गुटख्यांची चौकशी केली असता त्याच्याकडे हिरा आणि आरएमडी या गुटख्यांच्या पुड्या असल्याचे आढळले. त्याच भागातील अन्य एका टपरीवर चौकशी केली असता ओळखीचे असल्याशिवाय गुटखा दिला जात नसल्याचे विक्रेत्याने स्पष्ट केले. तेथून मिलकॉर्नरच्या दिशेने असणाऱ्या एका टपरीवर हिरा, आरएमडी मिक्स, गोवा या गुटख्यांच्या पुड्या सर्रास विक्रीस असल्याचे दिसले.
औरंगपुरा शहर बसस्थानक परिसरातील नाल्याच्या बाजूने असणाऱ्या एका पानटपरीवर माणिकचंद गुटख्याची चौकशी केली असता तेथे मिळाला नाही, मात्र त्याची एका पुडीची किंमत ३५ रुपये असल्याचे विक्रेत्याने सांगितले. हिरा आणि गोवा मात्र मिळतो, असेही स्पष्ट केले. या परिसरात महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांची रेलचेल असते. सर्रास सर्व व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना गुटखा दिला जात नाही, मात्र ओळखीचे किंवा नेहमीचे गिऱ्हाईक असणाऱ्यांनाच गुटख्याची विक्री होेते. जळगाव टी पॉइंट, बीड बायपास आदी ठिकाणीही विक्री होत असल्याची माहिती पानटपरी चालकांकडूनच मिळाली.
गारखेडा परिसरातील एका पानटपरीचालकाकडे हिरा गुटखा विक्रीस असल्याचे आढळले. मात्र, ही विक्री छुपेपणाने चालत असल्याचे दिसले. तर शिवाजीनगर रोडवरील एका टपरीवर चौकशी केली असता आपण गुटखा ठेवत नसल्याचे हा विक्रेता म्हणाला. याच विक्रेत्याजवळ अधिक चौकशी केली असता गुटखा ठेवणे परवडते आणि परवडतही नाही. अन्न व औषध प्रशासनाकडून कधी टपरीवर गुटखा विक्री होत असल्यासंदर्भात कधी चौकशी केली का, असे विचारले असता मला टपरी टाकून दोन वर्षे होत आली, मात्र अशी कोणतीही चौकशी झाली नसल्याचे या विक्रेत्याने स्पष्ट केले. बीड बायपासवरील एका पान विक्रेत्याकडे चौकशी केली असता अशी कोणतीही चौकशी मागील पाच- सहा महिन्यांत तरी झाली नसल्याचे त्याने सांगितले. मात्र पोलिसांची भीती असते.
सर्रास विक्री
अधिक माहिती घेतली असता गुटख्याची विक्री चोरीछुपे करावी लागत असल्याने त्याची अधिक किंमत घेऊन विक्री होत आहे. यातून पानटपरीचालकाला मोठा फायदा होत असतो. त्यामुळे बंदी असली तरी याची सर्रास विक्री होत असल्याचे समोर आले.
एका पुडीची किंमत ३५ रुपये
औरंगपुरा शहर बसस्थानक परिसरातील नाल्याच्या बाजूने असणाऱ्या एका पानटपरीवर माणिकचंद गुटख्याची चौकशी केली असता तेथे मिळाला नाही, मात्र त्याची एका पुडीची किंमत ३५ रुपये असल्याचे विक्रेत्याने सांगितले.
कारवाईची धास्ती नाही
मागील दोन महिन्यांत शहरात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
कारवाईची भीती नसल्यानेही शहरात गुटख्यांची खुलेआम आणि अधिक दराने विक्री होत असल्याचे समोर आले आहे.
शाळा परिसरातही ही विक्री चालू असल्याचे दिसते.