समाजसेवेच्या नावाखाली बेकायदेशीर ‘लकी ड्रॉ’
By Admin | Published: May 4, 2017 11:18 PM2017-05-04T23:18:48+5:302017-05-04T23:19:47+5:30
बीडतुम्हाला घर हवं असेल, फ्लॅट हवा असेल किंवा महागडी चार चाकी हवी असेल तर अवघ्या बाराशे रूपयात ती तुम्हाला मिळू शकते.
प्रताप नलावडे बीड
तुम्हाला घर हवं असेल, फ्लॅट हवा असेल किंवा महागडी चार चाकी हवी असेल तर अवघ्या बाराशे रूपयात ती तुम्हाला मिळू शकते. सोफा, डायनिंग टेबल आणि अगदी वॉशिंग मशिनपासून फ्रीजपर्यंतची कोणतीही वस्तू तुम्हाला याच किमतीत मिळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला जिल्ह्यात सुरू असलेल्या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. कोट्यावधी रूपयांच्या बक्षीसांच्या लोकांना भुलवणाऱ्या लकी ड्रॉ योजनांचा सध्या सुळसुळाट आहे. लोकांना अमिष दाखूवन अक्षरश: त्यांची लूट बेकायदेशीरपणे केली जात असतानाही शासकीय यंत्रणेची मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होताना दिसत आहे. फ्लॅटपासून ते महागड्या चार चाकी पर्यंतच्या बक्षीसांचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे जमा करण्यात आल्याने आणि अनेकांना बक्षीसेही दिले नसल्याच्या तक्रारी कूपन खरेदी करणारांकडून होऊ लागल्या आहेत. गृहोपयोगी वस्तूंची विक्री करण्याच्या आडून लकी ड्रॉचा धंदा केला जात आहे.
माजिक संस्थेची नोंदणी फक्त करायची आणि त्या नोंदणी क्रमांकाच्या आधारावरच ड्रॉसाठी कोणतीही शासकीय परवानगी न घेता खुलेआम लकी कुपनची विक्री करायची, असा गोरखधंदाच काहींनी सुरू केला आहे. कोणत्याही संस्थेला सामाजिक कार्यासाठी निधी उभा करायचा असेल तर लकी ड्रॉ काढता येतो. परंतु त्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. शिवाय ड्रॉ कोणत्या स्वरूपात काढण्यात येणार आहे, त्यातून जमलेला निधी कोणत्या कार्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे, याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देणे बंधनकारक आहे. शिवाय, पोलीस स्टेशनकडेही माहिती देणे आणि त्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात अनेकांनी सामाजिक कार्याआडून रग्गड कमाई करण्याचा सहज सोपा मार्ग म्हणून या ड्रॉचा उपयोग बेकायदेशीरपणे सुरू केला आहे. कोणतीही परवानगी न घेता आणि शासकीय नियमाला धाब्यावर बसवत ड्रॉचे आयोजन करून लाखो रूपयांची माया गोळा केली आहे.