गौण खनिजचे अवैधरीत्या उत्खनन; जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसांना तहसीलदारांकडून केराची टोपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:16 IST2024-08-19T13:16:25+5:302024-08-19T13:16:25+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माफियांद्वारे वाळू, मुरूम, दगडाचे अवैधरीत्या उत्खनन केले जाते. यामुळे नद्यांची चाळणी झाली तर डोंगर भुईसपाट झाले.

गौण खनिजचे अवैधरीत्या उत्खनन; जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसांना तहसीलदारांकडून केराची टोपली
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गौण खनिजचे अवैधरीत्या उत्खनन आणि वाहतूक होत असूनही कारवाया होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यास आठवडा उलटला तरी एकाही तहसीलदाराने खुलासा सादर केला नाही. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात माफियांद्वारे वाळू, मुरूम, दगडाचे अवैधरीत्या उत्खनन केले जाते. यामुळे नद्यांची चाळणी झाली तर डोंगर भुईसपाट झाले. अवैध स्टोन क्रेशरमुळे दगडखाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्वांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना शस्त्रधारी सुरक्षा रक्षकही देण्यात आले आहेत. परंतु तहसीलदारांकडून कारवाईच होत नसल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ९ ऑगस्ट रोजी सर्व तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली. २ दिवसांत खुलासा करावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला होता. यास आठवडा झाला तरी एकाही तहसीलदाराने नोटीसवर स्पष्टीकरण दिले नाही.
बैठकीत दिली होती खोटी माहिती
गेल्या महिन्यातील बैठकीला तहसीलदारांनी कुठेही गौण खनिजचे अवैध उत्खनन सुरू नाही. अवैध स्टोन क्रेशर सुरू नसल्याची माहिती दिली होती. बैठकीनंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चितेगाव परिसरात कारवाई करीत पाच अवैध स्टोन क्रेशर सील केले. पैठण तालुक्यातील कावसान येथील अवैध वाळू उत्खनन करणारी सात वाहने पकडली. तर बाबा पेट्रोल पंप भागात ११ वाहने पकडली. यावरून तहसीलदारांनी खोटी माहिती सादर केल्याचे स्पष्ट झाले.