शहरात अवैध रसवंत्यांचे पेव; महापालिका एकाही रसवंतीला परवानगी देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 05:40 PM2020-03-06T17:40:03+5:302020-03-06T17:43:30+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने अशा अनधिकृत रसवंत्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
औरंगाबाद : दरवर्षी शहरात महापालिकेतर्फे रसवंत्यांना तात्पुरती परवानगी देण्यात येत होती. यंदा शहरात एकाही रसवंतीला परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका परवानगी देत नसल्याने शहरात मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणी रसवंत्यांचे घुंगरू वाजू लागले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने अशा अनधिकृत रसवंत्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील मुख्य चौकांमध्ये दरवर्षी रसवंतीसाठी जागा मिळविण्यासाठी अक्षरश: स्पर्धा लागत होती. गरज पडली तर रसवंतीचालक पाहिजे तेवढी ‘किंमत’ मोजून जागा मिळवत होता. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता विभागातील अधिकारी, कर्मचारी उन्हाळा कधी सुरू होईल, अशी चातकासारखी वाट पाहत असत. अनेकदा रसवंतीसाठी जागा मिळत नसेल तर महापालिकेतील नगरसेवकांचे लेखी पत्रही आणण्यात येत होते. नगरसेवक राजकीय वजन वापरून संबंधितांना जागा मिळवून देत होते. जालना रोड, सिडको-हडको, जुन्या शहरात रसवंती लावण्यासाठी आजही स्पर्धा सुरू आहे. यंदा महापालिकेने एकाही रसवंतीला परवानगी द्यायची नाही, असे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात बर्फाचा चांगलाच पैसा कमविणाऱ्या रसवंतीचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दररोज मालमत्ता विभागाकडे परवानगीसाठी उंबरठे झिजविण्याचे काम काही रसवंतीचालक करीत आहेत. जुन्या ओळखीचा फायदा घेऊन काही मंडळी थेट महापौरांपर्यंत परवानगी मिळविण्यासाठी वशिला लावत आहेत. गतवर्षी मनपाने ८६ रसवंत्यांना परवानगी दिली होती. मनपाने जेथे जागा नेमून दिली होती, त्यापेक्षा कितीतरी मोठी रसवंती अनेकांनी टाकली होती. जळगाव रोडवर ग्रीन बेल्टमध्ये काहींनी रसवंत्या सुरू केल्या होत्या. शहरात अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. खंडपीठाने ९ ते ४५ मीटर रस्त्यांवर कोणालाही तात्पुरतीही परवानगी देऊ नये असे म्हटले आहे. त्यामुळे यंदा एकाही रसवंतीला परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मालमत्ता विभागातील सूत्रांनी दिली.
बुधवारी रसवंती बंद केली
पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ एका व्यापाऱ्याने रस्त्यावरच अनधिकृत रसवंती सुरू केली होती. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच बुधवारी ही रसवंती बंद करण्यात आली. शहरात मुख्य रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी आणखी कुठे अनधिकृत रसवंती सुरू आहेत, याची माहिती घेणे सुरू करण्यात आले आहे. अतिक्रमण हटाव विभागाकडून पुढील कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.