वैजापूरमध्ये अवैध धंद्यावर जरब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:06 AM2021-01-03T04:06:58+5:302021-01-03T04:06:58+5:30
वैजापूर : तालुक्यातील शिऊर, वीरगाव व वैजापूर या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘अवैध धंदे जोरात’ या मथळ्याखाली शनिवारी वृत्त ...
वैजापूर : तालुक्यातील शिऊर, वीरगाव व वैजापूर या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘अवैध धंदे जोरात’ या मथळ्याखाली शनिवारी वृत्त प्रसिद्ध होताच खंडाळा परिसरातील सर्व अवैध धंदे शनिवारी दिवसभर बंद असल्याचे चित्र दिसून आले. पोलिसांनी वृत्ताची दखल घेऊन सर्वत्र शोधमोहीम हाती घेतली. त्यात कोठेही अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आले नाही. अर्थात हीच परिस्थिती कायम राहणार की पोलीस माघारी फिरताच पुन्हा अवैध धंदेवाले डोके वर काढणार आहेत, याबाबत मात्र अनिश्चितता आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधीने तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत शुक्रवारी शिऊर, वीरगाव व वैजापूर येेथे स्टिंग ऑपरेशन केले. यात मटका, पत्त्यांचे अड्डे, अवैध दारू व गुटख्याची सर्रासपणे विक्री सुरू असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे वाळू तस्कर तालुक्यात सुसाटपणे वाळूची विक्री करीत असल्याचे दिसून आले. खंडाळा बसस्थानकाच्या पाठीमागील वट्यावर खुलेआम मटक्याचा व्यवसाय सुरू होता. ‘लोकमत’ने हे स्टिंगद्वारे समोर आणले असता पोलिसांनी शनिवारी सगळीकडे तपासणी सुरू केली. त्यात सर्वच अवैध धंदे बंद असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही बाब चांगली आहे, तरी देखील हे किती काळ कायम टिकणार आहे, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
---------
तक्रारीची नाही घेतली जात दखल
स्थानिक पोलिसांच्या मूक संमतीमुळेच सर्व काही आलबेल सुरू आहे. गेल्या काही दिवसांतील मटका, पत्त्यांचे डाव, दारू व अवैध गुटखा विक्रीचे वाढलेले गुन्हे पाहता अवैध धंदे किती जोमाने वाढले याची प्रचिती येते. सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जात नाही, त्यामुळेच अवैध धंद्यांना अधिक चालना मिळू लागली आहे, हे देखील सत्य नाकारता येणार नाही. बातमी प्रकाशीत होताच एक दिवस कारवाई करण्यासाठी बाहेर पडायचे, एरव्ही निवांत बसायचे हे काही योग्य ठरणार नाही. त्यामुळे ठाणे प्रमुखांना जातीने लक्ष घालून अवैध धंद्यांच्या पाठीमागील शक्तीवर जरब बसवावा लागणार आहे.
-----------
फोटो : कॅप्शन
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील बस स्थानकामागे ओट्यावर बसून खुलेआम मटका घेताना शुक्रवारी दिसून आले. शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच या ओट्यावर कोणीही फिरकले नाही, तर चहाच्या हॉटेलमध्ये सर्व काही बंद दिसून आले.