माजलगाव तालुक्यात अवैध धंदे
By Admin | Published: May 8, 2017 12:23 AM2017-05-08T00:23:37+5:302017-05-08T00:25:17+5:30
माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात वेगवेगळया जुगारांनी धुमाकूळ घातला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात वेगवेगळया जुगारांनी धुमाकूळ घातला आहे. जुगार चालविणारे आता लहानमुले, युवक तसेच महिलांना देखील आपल्या खेळात ओढतांना दिसत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात आठवडी बाजार भरतात तेथे जुगार चालविणाऱ्यांनी बस्तान बसविलेले आहे. पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
तालुक्यात राजेगांव, किट्टीआडगांव, सावरगांव, माजलगांव, पात्रुड, दिंद्रुड, नित्रूड आदी ठिकाणी आठवडी बाजार भरतात. या बाजारांमध्ये चिठ्ठी जुगार, गुडगुडी व तीनपत्ती आदी जुगार सुरू आहेत. जुगारापोटी बाजारात आलेले बाजारकरू खिसे रिकामे करून रिकाम्या हाताने परततांना दिसत आहेत. काही ठिकाणी सदरील खेळ सुरू असतांना जुगार चालविणाऱ्यांचेच लोक अमिषासाठी अगोदर रक्कम लागल्याचे दाखवत अनेक बाजारकरूंना गंडवतांना दिसतात. तसेच गावोगावी मटका बुकी असून, अनेकजण मटक्याच्या नादी लागून देशोधडीला लागले आहेत.
माजलगाव शहरात मटका चालकांनी नवीन पध्दत शोधून काढली आहे. यासाठी स्मार्टफोनचा देखील वापर होत आहे. तालुक्यात होणाऱ्या यात्रांमधून गुडगुडी, शुटबिल्ली हे जुगारी खेळ सर्रास चालविले जात आहेत. हे सर्व जुगार या विशेषत: युवक खेळतांना आढळायचे. मात्र, आता या खेळांमध्ये महिला देखील ओढल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.