'मी बनावट नव्हे हाडाचा शेतकरी '; शेतकरी आंदोलन प्रश्नांवर रावसाहेब दानवेंनी पळ काढला
By सुमेध उघडे | Published: December 15, 2020 04:38 PM2020-12-15T16:38:44+5:302020-12-15T16:47:38+5:30
Farmer Agitation at Delhi, Raosaheb Danve News माध्यमांमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास झाला.
औरंगाबाद : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन, पाकिस्तानचा आहे असे वक्तव्य करून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सनसनाटी निर्माण केली होती. या विधानानंतर त्यांच्यावर सर्वस्तरातून टीकाटिपण्णी सुरु आहे. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत हाच धागा पकडून पाकिस्तान आणि चीनचा शेतकरी आंदोलनात हात कसा ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता दानवे यांनी, 'मी बनावट नव्हे, हाडाचा शेतकरी. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्यानंतर मी काय बोलू ?' असे बोलून पत्रकार परिषदेतून पळ काढला. पत्रकार प्रश्न विचारात होते आणि दानवे उठून निघून जात होते असे चित्र पत्रकार परिषदेत होते.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यात एका आरोग्य केंद्राच्या उदघाटनावेळी धक्कादायक विधान केलं होते. दानवे यांनी "आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचवलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?", असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडले होते.
मंगळवारी रावसाहेब दानवे औरंगाबाद येथे शेतकरी कायद्यावर एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. सुरुवातीला दानवे यांनी नवे कृषी कायदे समजावून सांगितले. यानंतर सर्व पत्रकारांना एकाच वेळी प्रश्र्न विचारायला लावले. पत्रकारांनी शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे या विधानावर प्रश्न विचारले. यावर दानवेंनी माध्यमांमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास झाला. मी बनावट नव्हे, हाडाचा शेतकरी आहे इतकेच उत्तरे देत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. पत्रकार प्रश्र्न विचारत होते आणि रावसाहेब दानवे उठून निघून जात होते. पत्रकारांनी नेमका विपर्यास काय झाला ते तरी सांगा असेही विचारले मात्र दानवे न थांबता निघून गेले.