'मी सुद्धा फुकट जात नाही'; मौखिक परीक्षेसाठी पैसे मागणारे अधिष्ठाता सक्तीच्या रजेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 03:53 PM2020-08-17T15:53:59+5:302020-08-17T16:00:10+5:30
शैक्षणिक क्षेत्रातील हा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर कुलगुरूंनी तातडीने केली कारवाई
औरंगाबाद : स्वत:च्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे काम पूर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्यास अंतिम मौखिक परीक्षेसाठी (व्हायवा) येणाऱ्या बहिस्थ परीक्षकास ४० हजार रुपये आणि राहणे, जेवणासाठी २० हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असलेल्या सामाजिकशास्त्राच्या अधिष्ठातांनीच मागितल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत' ने उघडकीस आणला होता. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडालेल्या या प्रकाराची गंभीर दखल कुलगुरू प्रमोद येवले यांनी घेतली असून अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांना सोमवारी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
काय आहे प्रकरण :
विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील एका विद्यार्थ्याने पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करीत शोधप्रबंध ४ जून २०१८ रोजी विद्यापीठाला सादर केला. विद्यापीठाने हा प्रबंध मू्ल्यांकनासाठी परभणी आणि इतर ठिकाणच्या एका प्राध्यापकाकडे पाठविला. मार्गदर्शक तथा अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह इतर दोन जणांनी मूल्यांकन करून अहवाल विद्यापीठास पाठविला. तिन्ही अहवाल आल्यानंतर आठ दिवसांच्या आत दोन बहिस्थ परीक्षकांपैकी एकाला अंतिम मौखिक परीक्षेसाठी बोलावण्यात येते. विद्यापीठाच्या नियमानुसार ५०० किलोमीटरच्या आतील अंतरात असलेल्या परीक्षकाला बोलावले जाते. त्या परीक्षकास विद्यापीठ गाडीभाडे, भत्ता देते. त्यामुळे विद्यार्थ्याकडून पैसे मागणे नियमबाह्य असते. मात्र, राज्यशास्त्र विभागातील या विद्यार्थ्याचा परभणी जिल्ह्यातील बहिस्थ परीक्षकाची वेळ तीन वेळा घेण्यात आली. मात्र, पैसे मिळाले नसल्यामुळे तीनही वेळा व्हायवा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
निर्णय विद्यापीठाने घ्यावा; संशोधक विद्यार्थ्याचा निश्चय
हा संशोधक विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण असून, मागील काही वर्षांपासून तासिका तत्त्वावर महाविद्यालयात नोकरी करीत आहे. याठिकाणी सरासरी आठ हजार रुपये मिळत असल्याची माहितीही ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे. या तुटपुंज्या पगारात घर चालवणे शक्य होत नाही, त्यामुळे एकही रुपया लागत नसलेल्या व्हायवासाठी ६० हजार रुपये कोठून आणायचे, असा प्रश्न पडल्यामुळे विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवीचा विषयच बंद केला. जो काही निर्णय विद्यापीठाला घ्यायचा आहे ते घेतील, असेही संबंधित विद्यार्थ्याने ठरवून टाकले आहे.
संशोधक विद्यार्थी आणि अधिष्ठातांमधील संवाद :
पहिली क्लिप
विद्यार्थी : सर, व्हायवाची तारीख मिळाली का?
अधिष्ठाता : नाही.
विद्यार्थी : तुम्हाला भेटायला यावं म्हणतोय. पुढची डेट घेण्यासाठी.
अधिष्ठाता : या ना मग.
विद्यार्थी : कधी येऊ?
अधिष्ठाता : कधीही या. तुम्ही याल तेव्हा बोलेल त्यांच्याशी.(एक्सटर्नल रेफ्रिशी)
विद्यार्थी : उद्या येऊ का?
अधिष्ठाता : उद्या १२ तारीख. असं करा सोमवारी या.
विद्यार्थी : सोमवारी येणे कठीण आहे सर.
अधिष्ठाता : उद्या येता मग? त्यांना विचारावे लागेल डेटविषयी; पण डेटपेक्षा त्यांची व्यवस्था करावी लागेल तुम्हाला (पैशाची).
विद्यार्थी : सर व्यवस्था करू ना.
अधिष्ठाता : व्यवस्था पहिले करून घ्या ना.
विद्यार्थी : करतो ना सर.
अधिष्ठाता : पहिले व्यवस्था करा. ते घेऊन या. (पैसे) मग मी बोलतो त्यांच्याशी.
विद्यार्थी : सर, केवळ त्याच्यामुळंच लांबतय का?
अधिष्ठाता : मला तर तसंच वाटतंय.
विद्यार्थी : तेवढे ४० हजार फार होतायत ना सर... हॅलो... हॅलो... सर माझी तडजोड सुरू आहे. पैसे इकडून तिकडून बघत आहे. अजून या महिन्याचा पगार झाला नाही. दुस-यांकडून घेणं, विचारणं सुरू आहे. डेट वगैरे मिळाली. फायनल झाली असती तर काही करता आलं असतं.
अधिष्ठाता : मला यावर जास्त बोलता येत नाही. माझं काम संपलेलं आहे. यापलीकडं माझं काम नाही. काय ते तुम्ही पाहा.
दुसरी क्लिप
अधिष्ठाता : तुम्ही माझ्याकडे या. तुमचंच काम आहे. माझं नाही.
विद्यार्थी : माझंच काम आहे. बरोबर आहे आणि सर त्यात काही कमी होणार नाही का?
अधिष्ठाता : तुमच्याकडे किती आहेत सध्या?
विद्यार्थी : दहा-पंधरा हजार रुपयांपर्यंत आहेत.
अधिष्ठाता : तुम्ही एक काम करता. सध्या तुम्ही वीस हजार आणून द्या. बाकीचे मी टाकतो. नंतर तुमच्या पद्धतीने मला द्या.
विद्यार्थी : सर आता १५ हजार रुपये आहेत.
अधिष्ठाता : १५ नाही. २० हजार रुपये द्या. उर्वरित मी टाकत आहे. यापेक्षा अधिक मदत मी काय करू शकतो. तुम्ही तरी सांगा. आधीच खूप व्हायवा लांबलेला आहे. माझ्या डोक्याला ताप आहे. तो तरी कमी होईल.
तिसरी क्लिप
अधिष्ठाता : मला माहीत आहे. सगळ्यांना द्यावेच लागतात. तो माणूस येतो (रेफ्री) एक दिवस घालवतो. थेसिस वाचून रिपोर्ट पाठवतो. त्यामुळे त्याला पैसे देणे अपेक्षितच आहे. आता सगळीकडेच हे सुरू आहे. आम्हीही बाहेर जात असतो. सगळ्यांनाच अपेक्षित असते.
विद्यार्थी : सर पाच-सात हजार होते का ते बघा ना.
अधिष्ठाता : नाही होत हो आता.
विद्यार्थी : तुम्हाला रिक्वेस्ट करतो आता. तुम्हाला गिफ्ट देतो.
अधिष्ठाता : मला रिक्वेस्ट करून काय फायदा हो. (मोठ्याने हसतात अन विद्यार्थी विनंती करतो) मला गिफ्ट नको हो. मीसुद्धा बाहेर गेल्यावर घेतो ना. मी काही फुकट जात नाही ना.
(संशोधक विद्यार्थी आणि अधिष्ठाता यांच्या संवादाच्या एकूण सहा ऑडिओ क्लिप ‘लोकमत’ला प्राप्त झाल्या आहेत.)