आयएमएच्या डाॅक्टरांनी बंद ठेवला बाह्यरुग्ण विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:32+5:302020-12-17T04:24:32+5:30
औरंगाबाद- सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने अधिसूचनेद्वारे आयुर्वेदिक डॉक्टरांना ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची मुभा दिली. शासनाच्या या निर्णयाला ...
औरंगाबाद- सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने अधिसूचनेद्वारे आयुर्वेदिक डॉक्टरांना ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची मुभा दिली. शासनाच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा अशी १२ तास बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवून विरोध दर्शविला. शहरातील ५५० लहान- मोठ्या खाजगी, धर्मादायी दवाखान्यांत आयएमएचे सदस्य असलेल्या १४०० डाॅक्टरांनी या संपात सहभाग नोंदविला.
आयुर्वेदिक डाॅक्टरांना विरोध नसून मेडिकल कमिशनच्या ३२, ५० आणि ५१ या तीनही कलमांना आयएमएचा विरोध आहे. हे तीनही कलम हे मिक्सोपॅथीला प्रोत्साहन देतात. अशी परवानगी देणे हा रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे, असे म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टरांनी या निर्णयाचा कडकडीत विरोध केला आहे. साडेचार वर्षे एमबीबीएस, तीन वर्षे एमएसच्या शिक्षणाला लागतात. त्यानंतर मिळालेल्या सखोल ज्ञानातून प्रत्यक्ष अनुभवातून तज्ज्ञ डाॅक्टर शस्त्रक्रिया करतात. आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमानंतर जुजबी प्रशिक्षण घेऊन शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देणे अत्यंत धोकादायक ठरु शकते. त्यामुळे आयएमएच्या वैद्यकीय विद्यार्थी संघटनेच्या २८२ शाखा आदी सर्वांनी याला विरोध दर्शविला आहे. भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे आयएमएचे अध्यक्ष डाॅ. संतोष रंजलकर, सचिव डाॅ. यशवंत गाडे यांनी सांगितले. दिवसभरात तीस ते चाळीस ऐच्छिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होऊ दिला नसल्याचे आयएमएकडून सांगण्यात आले.
---
कोविडसह अत्यावश्यक सेवा सुरू
---
आयएमएचे चाैदाशे डाॅक्टर आणि साडेपाचशे रुग्णालयांनी ओपीडी बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला. मात्र, कोविड, अपघात विभागासह अत्यावश्यक उपचार सर्वच ठिकाणी सुरू होते.
-डाॅ. अनुपम टाकळर, उपाध्यक्ष, आयएमए