तोडफोड करणाऱ्यांंना तातडीने अटक करा; ते आमचे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:07 AM2018-08-11T00:07:11+5:302018-08-11T00:07:42+5:30
९ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंददरम्यान वाळूज एमआयडीसीमधील जवळपास ६० कंपन्यांत तोडफोड, वाहने जाळणारे ते समाजकंटक मराठा क्रांती मोर्चाचे नाहीत. पोलिसांनी त्यांना अटक करावी, या घटनेचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ९ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंददरम्यान वाळूज एमआयडीसीमधील जवळपास ६० कंपन्यांत तोडफोड, वाहने जाळणारे ते समाजकंटक मराठा क्रांती मोर्चाचे नाहीत. पोलिसांनी त्यांना अटक करावी, या घटनेचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
मराठा क्र ांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चाचा बंद औरंगाबाद शहरात अत्यंत शांततेत सुरू होता. दिवसभर मराठा समाज सहकुटुंब रस्त्यावर ठिय्या देत होता. शिवाय बंदची सांगताही राष्ट्रगीत आणि जिजाऊ वंदनाने करण्यात आला. दुसरीकडे वाळूज एमआयडीसीमध्ये पाळण्यात आलेल्या बंददरम्यान काही समाजकंटकांनी तेथील अनेक कारखान्यांमध्ये घुसून तोडफोड केली, अनेक वाहने जाळली. ही केवळ कारखान्यांची तोडफोड नसून औरंगाबाद शहराच्या अस्मितेची तोडफोड झाली. याप्रकरणी उद्योजकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्यांना आरक्षण मिळत नाही, त्यांना आम्ही काम देतो, असे विधान केले. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्हालाही असे वाटते येथे मोठे प्रकल्प यावेत, औरंगाबादचा विकास व्हावा आणि येथील तरुणांना रोजगार मिळावा. कालच्या घटनेमुळे आम्हीसुद्धा तुमच्या दु:खात सहभागी आहोत. झालेल्या तोडफोडीचा मराठा क्रांती मोर्चा जाहीर निषेध करीत आहे. तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे असूच शकत नाही. यापूर्वी राज्यात चाकणसह विविध ठिकाणी झालेल्या विध्वंसक आंदोलनातील अटकेतील लोकांची नावे वाचली तर ती अन्य समाजातील असल्याचे स्पष्ट झाले होते. तोडफोड करणारे तोंडाला रुमाल बांधून होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. यावरून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागावे, या उद्देशनेच समाजकंटक ांनीच वाळूजमध्ये तोडफोड केली असावी, असे आमचे ठाम मत झाले. तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आता समाजकंटकांना तातडीने अटक करावी, यामुळे या घटनेचा तपास सीआयडीमार्फत व्हावा, अशी आमची मागणी आहे. यावेळी रवी काळे, विजय काकडे, सुरेश वाकडे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, किशोर चव्हाण, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, अॅड. सुवर्णा मोहिते, सुकन्या भोसले हजर होते.
१५ पासून चूलबंद आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत २४ जणांचे बळी गेले. मोर्चे, बंद पाळल्यानंतरही शासनाकडून आम्हाला ठोस असे आश्वासन मिळत नाही, यामुळे १५ आॅगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. एक वेळ चूलबंद असे या आंदोलनाचे स्वरूप आहे. आमच्या आत्मक्लेशानंतर सरकारला निर्णय घ्यावा वाटेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.