लॉकडाऊनमधील स्थलांतरित पुन्हा शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:15+5:302020-12-17T04:33:15+5:30
औरंगाबाद : कोरोनात लॉकडाऊनमुळे शहरातून गावी परत आलेल्या बेरोजगार १० जणांनी रोजगार हमी योजनेसाठी नोंदणी केली; परंतु कोरोनाचा ...
औरंगाबाद : कोरोनात लॉकडाऊनमुळे शहरातून गावी परत आलेल्या बेरोजगार १० जणांनी रोजगार हमी योजनेसाठी नोंदणी केली; परंतु कोरोनाचा प्रभाव कमी होताच स्थलांतरितांनी पुन्हा गाव सोडून शहर गाठले आहे. इतरत्र रोजगार उपलब्ध झाल्याने रोहयोची मजूर संख्या आणि कामांची संख्या घटली आहे. रोहयोच्या कामांसाठी १० लाखांच्या आसपास जॉबकार्ड सध्या तयार आहेत. कोरोना काळात स्थलांतरितांनी रोहयोच्या कामासाठी मोठी नोंदणी केली होती. सध्या रोहयोवरील मजूर परिसरातीलच आहेत, असा दावा रोहयो विभागाने केला आहे.
मजूर घटणे म्हणजे इतरत्र रोजगार मिळणे
१५ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कामांचा आणि मजूर उपस्थितीचा आढावा घेतला तर यंदा मजूर आणि कामे कमी झाल्याचे दिसते. रोहयोच्या कामांवर मजूर संख्या घटणे म्हणजे इतरत्र जास्त मजुरी मिळणे असा होतो. कोरोनामुळे रोजगार स्थिर राहावा, नागरिकांची धावपळ होऊ नये म्हणून विविध कामे समाविष्ट करून योजना राबविली. आता सर्व काही सुरळीत झाल्यामुळे मजूर संख्या घटल्याचे दिसते आहे. शहरातून गावाकडे आलेले पुन्हा शहरात गेले आहेत, असे रोहयो उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी सांगितले.
जिल्ह्याची रोहयाची परिस्थिती अशी
औरंगाबाद जिल्ह्यात रोहयोची ८८८ कामे सुरू आहेत.
त्या कामांवर ४४१७ मजूर उपस्थित आहेत.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये ३ हजार कामे सुरू होती.
त्या कामांवर अंदाजे १३ हजार मजूर होते.
रोहयोची कामे वाढली की कमी झाली
या वर्षात मजुरांची संख्या कमी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर ते ग्रामीण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले; परंतु वैयक्तिक कामांसाठी रोहयोने प्राधान्य दिले. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे रोहयोच्या कामांवर मजूर वाढले नाहीत. परिणामी रोहयोची कामे कमी झाली. कृषी, फळबाग, ग्रामपंचायत, गायगोठा शेड, गॅबियन बंधारा, घरकुल, बिहार पॅटर्न, वैयक्तिक सिंचन विहीर, शोषखड्डे, सार्वजनिक विहीर, तुती लागवड, रोपवाटिका, बांधावरील वृक्षलागवड, रस्ता दुतर्फा करण्याची कामे सध्या सुरू आहेत. कोरोनामुळे वैयक्तिक लाभाची कामे यंदा आणली.