प्रभाव लोकमतचा : पाण्याचे टँकर जोडलेल्या ट्रॅक्टरवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 06:25 PM2019-06-14T18:25:39+5:302019-06-14T18:26:40+5:30
आरटीओ कार्यालय करणार तपासणी
औरंगाबाद : अनधिकृतपणे पाण्याचे टँकर जोडलेल्या ट्रॅक्टरवर आरटीओ कार्यालयकडून कारवाईचा बडगा उगारणार आहे. ट्रॅक्टरची तपासणी करून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.
शहरातील रस्त्यांवर पाण्याचे टँकर जोडून सुसाट धावणारे ट्रॅक्टर सर्रास निदर्शनास पडतात. मात्र, आरटीओ कार्यालयात केवळ ट्रॅक्टरला जोडण्यात येणाऱ्या ट्रॉलींची नोंद होत आहे. ट्रॅक्टरला जोडलेल्या पाण्याच्या टँकरची नोंदच नाही, असे विनाक्रमांकाचे टँकर जोडून धोकादायकरीत्या ट्रॅक्टर धावत आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे.
जिल्ह्यात ट्रॉलीच्या नावाखाली ट्रॅक्टरला सर्रास पाण्याचे टँकर जोडण्याचा प्रकार सुरूआहे. ट्रॅक्टरला जोडलेले बहुतांश पाण्याचे टँकर हे विनाक्रमांकाचे आहेत. त्यामुळे ती अनधिकृत असल्यावर शिक्कामोर्तब होत आहे. मात्र, त्याकडे आरटीओ प्रशासनाचे दुर्लक्ष होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने १३ जून रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच जागे झालेल्या आरटीओ कार्यालयाने पाण्याचे टँकर जोडलेल्या टँकरची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणीटंचाईचा प्रश्न
सध्या शहरासह नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत कारवाई केली तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची भीती आरटीओ कार्यालयाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती निवळल्यानंतर अनधिकृतपणे पाण्याचे टँकर जोडलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई सुरू करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.