महामॅरेथॉनसाठी पोलीस प्रशासनाने उभारली सुरक्षेची अभेद्य भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:29 PM2018-12-17T14:29:40+5:302018-12-17T14:31:18+5:30
शहर पोलिसांच्या अभूतपूर्व सहकार्यांमुळे स्पर्धकांना विनाअडथळा धावण्याची शर्यत पूर्ण करता आली.
औरंगाबाद : लोकमतच्या महामॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूला रस्त्यात कोणत्याही प्रकारच्या वाहनांपासून अडथळा होणार नाही, याची प्रचंड खबरदारी घेण्यासाठी सुमारे दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत मॅरेथॉन मार्गावर खडा पहारा दिला. शहर पोलिसांच्या अभूतपूर्व सहकार्यांमुळे स्पर्धकांना विनाअडथळा धावण्याची शर्यत पूर्ण करता आली.
लोकमत महामॅरेथॉन स्पर्धा रविवारी पहाटे मोठ्या उत्साहात पार पडली. हजारो स्पर्धक आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी कडाक्याच्या थंडीत रस्त्यांवर उभ्या असलेल्या नागरिकांमुळे स्पर्धेला उधाण आले होते. लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेतील धावपटंूना कोणताही त्रास होणार नाही, त्यांना अपघात होणार नाही, याची खबरदारी वाहतूक पोलिसांनी घेतली. स्पर्धेच्या दोन दिवसआधीच विभागीय क्रीडा संकुल ते हडकोतील उद्धवराव पाटील चौकापर्यंतच्या ज्या रस्त्यावरून स्पर्धक धावणार आहेत, तो रस्ता वाहतुकीसाठी स्पर्धेच्या कालावधीकरिता बंद करण्याची अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काढली होती.
यामुळे वाहनचालकांची गैरसोय टळली. नागरिकांनी स्पर्धेच्या कालावधीत त्यांची वाहने रस्त्यावरून न नेल्यामुळे स्पर्धकांना विनाअपघात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त एच. एस. भापकर, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड हे स्वत: स्पर्धेच्या मार्गावरून गस्तीवर होते. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भारत काकडे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सिडको शाखेचे निरीक्षक हनुमंत गिरमे, जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे यांच्यासह सुमारे २१ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांनी वाहतूक आणि बंदोबस्तासाठी कडाक्याच्या थंडीत खडा पहारा दिला.
विविध ठिकाणी लावलेले बॅरिकेडस्चा ठरले फायदेशीर
२१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर आणि दिव्यांग रन, अशा विविध प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या मार्गात अनेक ठिकाणी अचानक रस्त्यावर वाहने येण्याचा धोका होता. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार विविध ठिकाणी बॅरिकेडस् लावून स्पर्धेच्या कालावधीपुरते रस्ते बंद करण्यात आले होते.