अपहरणाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले; जाब विचारताच दोघांना पाजले विष, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:06 PM2022-12-06T15:06:20+5:302022-12-06T15:08:10+5:30
जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिघांना केली मारहाण, विषारी द्रव्य पाजत केला जीवे मारण्याचा प्रयत्न
वाळूज महानगर (औरंगाबाद) : मुलाच्या अपहरणाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिघांना बेदम मारहाण करुन दोघांना विष पाजल्याची घटना सोमवार (५) सकाळी वाळूजला घडली. या घटनेत रमेश बबन काळे (३९, रा. नवीन शिवराई) याचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी ५ जणांविरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पोपट नारायण पवार (४०, रा.नवीन शिवराई) यांचा मुलगा जॉन्सन याचे वर्षभरापूर्वी वाळूज येथील रावसाहेब सिताराम काळे याची मुलगी सीमा हिच्या सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर तीन महिन्यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे सीमा काळे हिचा खुन झाला होता. या खुनाच्या घटनेंतर रावसाहेब काळे याने जॉन्सन पवार, जावई रवी काळे व मोठा भाऊ तान्हाजी पवार यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या खुनाच्या गुन्ह्यानंतर पोपट पवार व रावसाहेब काळे यांच्यात समेट होऊन खुनाची केस मागे घेण्यासाठी रावसाहेब काळे याने पोपट पवार याचे शिवराई गावातील घर मागत बळजबरीने या घराचा ताबा घेतला होता. या घटनेनंतर पवार व काळे कुटुंबियात काही दिवसापासून वाद सुरु होता. अशातच रावसाहेब काळे याची पत्नी सुनंदा काळे हिने तिचा मुलगा तेजवील (१५) याचे अपहरण झाल्याची तक्रार आठवडाभरापुर्वी वाळूज पोलिस ठाण्यात देऊन पोपट पवार, अश्विनी पवार, तान्हाजी पवार व सुदर्शन या चौघावर संशय व्यक्त केला होता.
जाब विचारण्यासाठी गेलेल्यांना मारहाण, विषारी द्रव्य पाजले
तेजवील काळे या मुलाच्या अपहरणाची खोटी तक्रार दाखल केल्यानंतर पोपट पवार व त्याचे कुटुंबीय अडचणीत सापडले होते. दरम्यान, सोमवारी अपहरण झालेला तेजवील हा कुटुंबासह वाळूजला असल्याची माहिती पोपट पवार यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोपट पवार हे पत्नी सुनंदा व मेव्हणा रमेश बबन काळे यांना सोबत घेऊन सकाळी १० वाजता वाळूजला पोहचले. यावेळी तेजवील हा त्याच्या आई-वडिलासोबत असल्याने पोपट पवार यांनी काळे कुटुंबियास आमच्या विरोधात अपहरणाची खोटी तक्रार का दिली याचा जाब विचारला. यानंतर पवार व काळे कुटुंबियात वाद होऊन रावसाहेब काळे, शिवा काळे, राजवीर काळे, सुनंदा काळे, अनिल पवार यांनी पोपट पवार, अश्विनी पवार व रमेश काळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अश्विनी पवार ही जखमी झाल्याने ती घटनास्थळावरुन पळून गेली. यानंतर पोपट पवार व रमेश काळे या दोघांना विषारी द्रव्य पासाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करुन सर्वांनी पळ काढला.
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
अश्विनी पवार यांनी घटनास्थळी परत येत पती पोपट पवार व भाऊ रमेश काळे या दोघांना रिक्षातून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरु असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास रमेश काळे याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पोपट पवार यांच्या फिर्यादीवरुन रावसाहेब सिताराम काळे, शिवा सिताराम काळे, राजवीर उर्फ बुटेल रावसाहेब काळे, सुनंदा रावसाहेब काळे, अनिल शैनाज पवार (सर्व रा.वाळूज) या ५ जणाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रावसाहेब काळे व शिवा काळे या दोघांना ताब्यात घेतले असून तिघा आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले व सहा.निरीक्षक विनायक शेळके यांनी सांगितले.