पितृपक्षात मोहाच्या पत्रावळीस महत्व; छत्रपती संभाजीनगरात रोज २५ हजार पत्रावळींची विक्री
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 6, 2023 04:49 PM2023-10-06T16:49:14+5:302023-10-06T16:54:42+5:30
मोहाची झाडे फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे पक्ष पंधरवड्यात शेकडो महिलांना हंगामी रोजगार मिळतो.
छत्रपती संभाजीनगर : सध्या पितृपक्ष सुरू असून,या काळात पूर्वजांच्या नावे श्राद्ध केले जाते, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. यासाठी पिंडदान केले जाते. हे पिंड ठेवण्यासाठी सोने-चांदी-स्टीलचे ताट किंवा केळीची पाने लागत नाहीत, तर चक्क मोहाच्या झाडाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळीचा वापर केला जाते. यामुळे मोहाच्या पत्रावळीला मागणी वाढली असून, शहरात दररोज २५ हजारांपेक्षा अधिक पत्रावळी विकल्या जात आहेत.
जिल्ह्यात मोहाची झाडे फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे पक्ष पंधरवड्यात शेकडो महिलांना हंगामी रोजगार मिळतो. याच तालुक्यातून शहरात दररोज २५ ते ३० हजार पत्रावळी विक्रीसाठी आणल्या जातात. सुपारी हनुमान रोड, गारखेड्यातील गजानन महाराज मंदिर चौक, टीव्ही सेंटर चौक येथे पत्रावळी विक्रेते बसतात. पूर्वजांना जेऊ घातले जात असले तरी त्यातून अनेकांना हंगामी रोजगार मिळतो, हे विशेष.
मोहाची पत्रावळी व द्रोण २० रुपयांत
मोहाच्या पत्रावळी याच पितृपक्ष पंधरवड्यात दिसून येतात. त्यानंतर वर्षभर या पत्रावळ्या दिसतही नाहीत. मागील वर्षी १० रुपयांना मिळणारी पत्रावळी सध्या १५ रुपयांना एक नग मिळत आहे. त्यासोबत एक द्रोण ५ रुपयांना म्हणजे पत्रावळी व द्रोण २० रुपयात विकले जात आहे. कोरोनाआधी मोहाची पत्रावळी ५ रुपयांना एक मिळत असे, अशी माहिती होलसेल विक्रेते एकनाथ काथार यांनी दिली.
मोहाची पत्रावळीच का?
धर्मशास्त्रात पितरांच्या भोजनाला पात्र कसे असावे? पितळ, कास्य, लोह (स्टील) यांचे ताट श्राद्धाला निषिद्ध मानलेले आहे. कास्य, पितळाच्या ताटात पितर जेऊ घालू नयेत. कन्या राशीत सूर्य असतो तेव्हा पितृपक्ष सुरू होतो. अशा वेळेस केळीच्या पानांचाही ‘निषेध’ सांगितलेला आहे. यामुळे मोहाच्या पानाची पत्रावळी चालते.
- वेदमूर्ती सुरेश केदारे गुरुजी.