वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:22 PM2023-01-24T19:22:54+5:302023-01-24T19:23:15+5:30
विद्यार्थ्यांकडून नाराजी, युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक, आय ऑन डिजिटल केंद्रावरील घटना
औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीत ‘आय ऑन डिजिटल’ या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी प्रवेशद्वार बंद झाल्यावर तीन मिनिटांनी पोहोचले. मात्र, प्रवेशद्वार बंद झाल्यावर प्रवेश न मिळाल्याने ११ विद्यार्थी सीआरपीएफच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला मुकले. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे दाद मागितली. मात्र, परीक्षा केंद्राने आडमुठी भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीआरपीएफमधील विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सध्या सुरू आहेत. विविध पदांसाठी असलेल्या परीक्षेला मराठवाड्यातून विद्यार्थी आलेले होते. सकाळी ११:४५ ते १२:४५ वाजण्याच्या दरम्यान असलेल्या परीक्षेसाठी ११:१५ वाजेपर्यंत प्रवेशासाठी मुदत होती. प्रवेशाची वेळ संपल्यावर काही मिनिटांनी धापा टाकत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी आत घेण्याची विनंती केली. मात्र, त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केंद्रावर बोलावले. हनुमान शिंदे, ज्ञानेश्वर डांगे, मनोज बोरा, मनोज गांगवे, स्वप्निल डिडोरे यांनी केंद्र संचालकांकडे विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी केली. मात्र, केंद्र संचालकांनी परीक्षा सुरू होईपर्यंत दाद दिली नाही. अखेर परीक्षा सुरू झाल्यावर केंद्रावरील अधिकारी पदाधिकाऱ्यांशी बोलले; पण त्यावेळी वेळ निघून गेली होती, असे नाशिक जिल्ह्यातून ढेकू खुर्द येथून परीक्षेसाठी आलेल्या रितिका जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
केंद्र शोधण्यातही अनेकांना उशीर...
केंद्र शोधण्यात वेळ गेल्याने पाच मिनिटे उशीर झाला. त्यामुळे फुलंब्री येथील आलेल्या राहुल पवार यांनाही परीक्षेला मुकावे लागले. सागर गोराडे, योगेश राठोड, अनिकेत पाटील, गौरव ठोंबरे, महेश जुधरे, नीलेश गोडखे, गणेश पानखेड, रामेश्वर देवगाेने, राहुल गोलवडे, यांचीही परीक्षेची संधी हुकली. या विद्यार्थ्यांना हेल्पलाइनवर मेल पाठवून दाद मागण्याचे सांगून माघारी पाठविण्यात आले.