मराठवाड्यासाठी महत्वाचे; विद्यापीठातील डीएनए बारकोडिंग प्रयोगशाळेत होणार कर्करोगाचे निदान
By राम शिनगारे | Published: January 5, 2024 01:49 PM2024-01-05T13:49:57+5:302024-01-05T13:50:25+5:30
मराठवाडा मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने चार कोटींचे दिले यंत्रे
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 'पॉल हेबर्ट सेंटर फाॅर डीएनए बारकोडिंग ॲण्ड बायोडायर्व्हसिटी स्टडीज' संस्थेच्या प्रयोगशाळेत आता माफक दरात गुणसूत्रांचे पृथकरण, जनुकीय विश्लेषण आणि कर्करोगाचे निदान होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली तब्बल चार कोटी रुपयांची यंत्रसामुग्री कमलनयन बजाज हॉस्पिटलशी संबंधित मराठवाडा मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिली आहे. या यंत्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे.
विद्यापीठातील डीएनए बारकोडिंग प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. बायोडायर्व्हसिटीच्या संबंधित वेगवेगळ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यातच कोरोनाच्या काळात याच संस्थेत कोविड टेस्टिंग लॅब सुरू केली होती. त्याचा मोठा फायदा मराठवाड्याला संकटकाळी झाला. आता मराठवाड्यातून गुणसूत्रांचे पृथकरण, जनुकीय विश्लेषण आणि कर्करोगांचे निदान करण्यासाठी सॅम्पल घेऊन पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी ठिकाणी तपासणीसाठी पाठवावे लागते. त्यासाठी पैसेही अधिक खर्च होतात आणि वेटिंगही करावी लागते. हा विचार करून कमलनयन बजाज हॉस्पिटलशी संबंधित संस्थेने कर्करोगासह इतर प्रकारच्या तपासण्या करण्यासाठीची सायटोजॅनॅटीक प्रयोगशाळा शहरातच सुरू व्हावी, यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावानुसार मराठवाडा मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट संस्थेने विद्यापीठाला चार कोटी रुपयांची यंत्रे सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिली आहे.
ही यंत्रे नुकतीच तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, बजाजचे सी. पी. त्रिपाठी, डॉ. एस. फर्नांडीस, अनिल भंडारे, डॉ. भालचंद्र वायकर, अधिसभा सदस्य डॉ. विक्रम खिलारे, डीएनए बारकोडिंगचे संचालक डॉ. गुलाब खेडकर, डॉ. निवेदिता दत्ता आदींच्या उपस्थितीत सुपूर्द केली आहेत. त्याशिवाय फक्त यंत्रेच दिली नाहीत तर कार्यान्वित करण्यासाठी बजाज हॉस्पिटलकडून मदतही केली जाणार आहे.
तपासण्यासाठी हे यंत्र मिळाले
बजाजकडून फ्लो सायटोमीटर, डीएनए सिक्वेन्सर, इमेज ॲनालिसिस सिस्टम ही प्रमुख यंत्रे मिळाली असून, त्यासाठी आवश्यक छोटी-मोठी यंत्रेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सर्वांची किंमत चार कोटी रुपये एवढी असल्याची माहिती संचालक डॉ. खेडकर यांनी दिली.
कोविड लॅबमध्ये ६ लाख ८२ हजार तपासण्या
डीएनए बारकोडिंग संस्थेच्या प्रयोगशाळेत उभारलेल्या कोविड टेस्टिंग लॅबमध्ये आजपर्यंत तब्बल ६ लाख ८२ हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे संस्थेचे विद्यापीठ प्रशासनामार्फत जिल्हा प्रशासनाने कोविड टेस्टिंग लॅबसाठी ३५ लाख रुपयांची मागणी केली आहे. त्यानुसार कोराेनाचा प्रदुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यास कोविड लॅब जनतेच्या सेवेसाठी सज्ज असणार आहे.
सायटोजॅनॅटकी प्रयोगशाळा उभी राहणार
मराठवाडा मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटकडून उपलब्ध झालेल्या यंत्रांमुळे बायोमेडिकल रिसर्च होण्यासाठी सायटोजॅनॅटकी प्रयोगशाळाच उभी राहणार आहे. या यंत्रसामुग्रीमुळे बायोमेडिकल रिसर्च व रुग्णालयांना माफक दरात गुणसूत्रांचे पृथकरण, जनुकीय विश्लेषण आणि कर्करोगांचे निदान इत्यादी सेवा देता येऊ शकतील.
- डॉ. गुलाब खेडकर, संचालक, डीएनए बारकोडिंग संस्था, विद्यापीठ