महत्वाची माहिती, २० रुपयांत दोन लाखांचा विमा तुम्ही काढला का? येथे करा अर्ज
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 10, 2023 05:49 PM2023-06-10T17:49:53+5:302023-06-10T17:50:27+5:30
२० रुपयांत दोन लाखांचा विमा काढला जातो. तुम्हाला हे माहिती आहे का, नसेल तर पुढील माहिती आवश्यक वाचा.
छत्रपती संभाजीनगर : माणसाच्या जीवनाचे काही खरे राहिले नाही. रस्त्यात चालता चालता कधी कोणती दुर्घटना घडले, किंवा वाहनांचा अपघात होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. अपघात झाल्यानंतर रुग्णाला होणारा भयंकर त्रास तर सोडाच रुग्णालयात येणारा खर्च ही डोंगराएवढा असतो. याचा सर्वांगीण विचार करुन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे. याद्वारे २० रुपयांत दोन लाखांचा विमा काढला जात आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, नसेल तर पुढील माहिती आवश्यक वाचा.
काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ?
दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्त्वाचे आहे. अनावधानाने अपघात झाल्यास अशा वेळी पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना आर्थिक मदतीसाठी धावून येते.
२० रुपयांत दोन लाखांचा विमा
या योजनेचा विमा हप्ता केवळ २० रुपये असून विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला २ लाख रुपये अर्थसाह्य मिळते. अपघातात पूर्णतः अपंगत्व आल्यास २ लाख रुपये व आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मिळतात.
जिल्ह्यात ७.७३ लाख विमाधारक
१) ५० लाख ४१ हजार एकूण बचत खातेधारक जिल्ह्यात आहेत.
२) ३८ लाख ५५ हजार खातेधारक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्र आहेत.
३) ७ लाख ७३ हजार खातेधारकांचा विमा काढण्यात आला आहे.
आपल्या बँकेत करा अर्ज
तुमचे बचत खाते ज्या बँकेत आहे. त्या बँकेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज दाखल करावा. दरवर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागते. दरवर्षी विम्यापोटी २० रुपये तुमच्या खात्यातून बँक ही कपात करेल.
अटी काय आहेत
१) अपघात विमा न नोंदवलेले नागरिकांचा यात समावेश होतो.
२) १८ ते ७० वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
३) विमा काढणाऱ्या व्यक्तीचे त्या बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
४) योजनेसाठी वार्षिक हप्ता २० रुपये असून तो दरवर्षी विमाधारकांच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होईल.
५) हप्त्यासाठी आर्थिक वर्ष १ जून ते ३१ मे असणार आहे.
विमा आवश्य काढा
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे केंद्र सरकारने नागरिकांसाठी मोठे सुरक्षा कवच दिले आहे. वर्षाला २० रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी हा विमा काढावा.
- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक